शहर बससेवा कोलमडली

शहर बससेवा कोलमडली

नागपूर - वंश निमय या शहर बस ऑपरेटरकडून बस हस्तांतरण व नव्या ऑपरेटरकडे वाहनचालकांची तोकड्या संख्येमुळे शहर बस वाहतुकीची घडी विस्कटली आहे. त्याचा मंगळवारी शहरवासींना फटका बसला. वंश निमयकडील वाहनचालक व नव्या ऑपरेटरची बैठक पार पडली. यात किमान महिनाभरासाठी सकारात्मक तोडगा निघाला असून, उद्यापासून शहर बससेवा सुरळीत चालण्याची शक्‍यता आहे.

शहर बससेवा चालविणाऱ्या वंश निमय या कंपनीचा करार संपुष्टात आला. त्यामुळे स्टार बस चालविणारे ड्रायव्हर तीन नव्या ऑपरेटर कंपनीच्या संपर्कात आहेत. सद्यस्थितीत नव्या ऑपरेटरपैकी नागपूरच्या ऑपरेटकर कंपनीकडून ३०, पुण्याच्या ऑपरेटर कंपनीकडून ४०, तर दिल्लीतील ऑपरेटरकडून १४ बसेस शहरात सुरू आहे. मात्र, तीस लाखांच्या शहरात ही बससेवा अपुरी आहे. याशिवाय नव्या ऑपरेटर्सने नवे वाहनचालक नियुक्त केले आहे. या नव्या वाहनचालकांकडून जुन्या स्टार बस चालविण्याची कसरत नव्या ऑपरेटर्सना करावी लागत आहे.

जुन्या स्टार बसवर जुन्या वाहनचालकांचे हात बसले आहेत. ते या बसेस योग्यरीत्या चालवू शकतात. त्या तुलनेत नव्या वाहनचालकांना चांगलाच मनस्ताप होत आहे. मंगळवारी सायंकाळी प्रवासी घेऊन जाणारी जुनी स्टार बस विधानभवन चौकातच बंद पडली. ही बस कशी सुरू करावी, हे नव्या वाहनचालकाला कळले नाही. त्यामुळे प्रवाशांना उतरवून चौकातच बस सोडून वाहनचालकाने पळ काढला. त्यामुळे प्रवाशांनाही मनस्ताप झाला. एवढेच नव्हे आज अनेक भागांमध्ये शहर बस वेळेवर पोहोचली नसल्याचेही काहींनी सांगितले. सायंकाळी महापालिकेत  जुने वाहनचालक व नव्या ऑपरेटर्सची बैठक पार पडली. बैठकीत मनपा परिवहन विभागाचे व्यवस्थापक जगताप उपस्थित होते. बैठकीत वाहनचालकांनी नव्या ऑपरेटर्ससोबत काम  करण्याची सशर्त तयारी दर्शविली.

तूर्तास टळले संकट
परिवहन विभागाचे व्यवस्थापक जगताप यांनी जुन्या बसचालकांना नव्या ऑपरेटर कंपन्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेकांनी संपर्क साधला. परंतु, वेतनावरून गाडी घसरली. त्यामुळे शहर बससेवेला आणखी काही दिवस फटका बसण्याची शक्‍यता होती. मात्र, बैठकीत जुन्या वाहनचालकांनी एक महिना नव्या ऑपरेटरला सेवा देण्याचा निर्णय घेतला. मात्र, महिनाभरात वेतनाचा प्रश्‍न सुटला नाही, तर सेवा देणार नसल्याचे वाहनचालकांनी सांगितले. त्यामुळे तूर्तास तरी शहर बसवरील संकट टळले असून, उद्यापासून नागपूरकरांना उत्तम सुविधेची शक्‍यता आहे.

नव्या ऑपरेटकडे सामावून घेण्याबाबत मनपाने भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे आम्ही आंदोलन करणार होतो. मात्र, नवीन ऑपरेटरने नेमलेल्या कर्मचाऱ्यांना काम जमत नसल्यामुळे आम्हाला कामावर येण्यास सांगण्यात आले आहे. सध्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असल्याने आम्ही संपाचा निर्णय मागे घेतला. नवीन ऑपरेटकडे सामावून घेण्यासह १६ हजार ५०० रुपये किमान वेतन न मिळाल्यास न्यायालयात दाद मागणार. 
-संतोष कान्हेरकर, संघटक-महाराष्ट्र जनरल कामगार युनियन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com