महापौरांसह नगरसेवकांची उमेदवारीसाठी धडपड

राजेश प्रायकर ः @rajeshp_sakal
रविवार, 22 सप्टेंबर 2019

नागपूर ः विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून विविध राजकीय पक्षांतील इच्छुकांनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केली. आजी, माजी पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पक्षांकडे उमेदवारी मागितली आहे. यात नेहमीप्रमाणे नगरसेवकही मागे नाही. महापौर नंदा जिचकार यांच्यासह डझनभर नगरसेवकांनी पक्षाकडे विविध मतदारसंघातून दावेदारी केली.

नागपूर ः विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून विविध राजकीय पक्षांतील इच्छुकांनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केली. आजी, माजी पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पक्षांकडे उमेदवारी मागितली आहे. यात नेहमीप्रमाणे नगरसेवकही मागे नाही. महापौर नंदा जिचकार यांच्यासह डझनभर नगरसेवकांनी पक्षाकडे विविध मतदारसंघातून दावेदारी केली.

नगरसेवक ते आमदार प्रवास करणारे अनेकजण नागपुरात आहेत. अक्षरशः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही महापौर असताना आमदार झाले. कृष्णा खोपडे, सुधाकर कोहळे, डॉ. परिणय फुके, विकास कुंभारे, प्रा. अनिल सोले, नाना श्‍यामकुळे अशी मोठी यादी आहे. शहर कॉंग्रेस अध्यक्ष विकास ठाकरेही नगरसेवक असताना विधानसभेच्या रिंगणात होते. प्रफुल्ल गुडधे पाटील यांनीही मागील निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आव्हान उभे केले होते. आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात नगरसेवकांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केली आहे. यात महापौर नंदा जिचकार यांच्यासह माजी महापौर प्रवीण दटके यांचाही समावेश आहे. एकाच मतदारसंघातून एकाच पक्षाच्या अनेकांनी दावेदारी केल्याने लढतीपूर्वी उमेदवारीसाठीही चुरस दिसून येत आहे. भाजपतर्फे उमेदवारीसाठी पश्‍चिम मतदारसंघातून अनेक इच्छुक आहे. यात महापौर नंदा जिचकार, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, नासुप्रचे विश्‍वस्त भूषण शिंगणे यांचा समावेश आहे. एकाच मतदारसंघातून अनेकांच्या उमेदवारीची डोकेदुखी कॉंग्रेसलाही सहन करावी लागणार आहे. मध्य नागपुरातून नगरसेवक बंटी शेळके व रमेश पुणेकर यांनी दावेदारी केली. पूर्व नागपुरातून विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांनी उमेदवारी मागितली आहे. पश्‍चिममधून भाजपतर्फे कुणाला उमेदवारी मिळणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. मध्य नागपुरातून बंटी शेळके व रमेश पुणेकर यांच्यात रस्सीखेच असून या दोघांपैकी एकाला मिळणार की तिसऱ्याच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडणार? पूर्व नागपुरातही हजारे की वनवे? याबाबतही नागरिकांत उत्सुकता आहे. याशिवाय उत्तर नागपुरात कॉंग्रेसचे संदीप सहारे व मनोज सांगोळे यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. मध्य नागपुरातून भाजप शहराध्यक्ष व महाल येथील प्रभागाचे नेतृत्व करीत असलेले माजी महापौर प्रवीण दटके यांनी उमेदवारी मागितली आहे. उत्तर नागपुरातून धर्मपाल मेश्राम व संदीप जाधव या नगरसेवकांचीही नावे चर्चेत आहे. सेनेचे नगरसेवक किशोर कुमेरियाही दक्षिणमध्ये लढण्यास उत्सुक आहे. यापूर्वी त्यांनी येथूनच विधानसभा निवडणूक लढविली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: City councilors including mayors push for candidacy