महापौरांसह पदाधिकाऱ्यांकडून स्वच्छता शुल्क वसुली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नागपूर :  महापालिकेने आजपासून घराघरांतून, आस्थापना, प्रतिष्ठानांकडून स्वच्छता शुल्क वसुलीस प्रारंभ केला. महापौर नंदा जिचकार यांच्यासह मनपातील पदाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांनी आज स्वच्छता शुल्क वसूल केले. पहिल्याच दिवशी 44 हजार रुपये वसूल करण्यात आले. सामान्य नागरिकांना दर महिन्याला 60 रुपये स्वच्छता शुल्क द्यावे लागणार असल्याने नागपूरकरांना आणखी एका खर्चाचा भार सहन करावा लागणार आहे.

राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे घराघरांतून कचरा उचलण्याकरिता दर महिन्याला प्रतिघर 60 रुपये शुल्क वसूल करण्यात येत आहे. याबाबत प्रत्येक झोनमध्ये मोहीम राबविण्यात येत असून याअंतर्गत पहिल्या दिवशी महापौर नंदा जिचकार, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, नगरसेविका रिता मुळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व नगरसेवकांनीही स्वच्छता शुल्क भरला. स्वच्छता शुल्क वसुलीसाठी आरोग्य विभागाच्या वतीने दहाही झोनमधून प्रत्येक झोनस्तरावर कर्मचाऱ्यांची निवड केली आहे. कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक घरी जाऊन 60 रुपये स्वच्छता शुल्क वसूल केले जाते व त्याची पावती दिली जाते. नागरिकांनी शुल्क जमा करावे व त्याची पावती घ्यावी. घरोघरी येऊन कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांमध्ये कचरा टाकताना नागरिकांनी आधीच ओला व सुका कचरा विलग करावा व त्याप्रमाणेच कचरा गाडीत टाकावा, असे आवाहन मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले. घरांशिवाय दुकाने, दवाखाने, शोरूम, हॉटेल्स, रेस्टॉरंट, रुग्णालये आदींकडूनही वेगवेगळे स्वच्छता शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे एका नागरिकाला वर्षाला 720 रुपये द्यावे लागणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cleanliness charges are levied by mayor