मेट्रो, पीडब्ल्यूडी करणार ड्रेनेज लाइनची स्वच्छता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मे 2019

नागपूर : मागील वर्षी वर्धा रोडवर मेट्रो रेल्वे कामामुळे ड्रेनेज लाइन फुटल्याने रस्त्यांवरील दुकानांत, घरांत पाणी शिरून नागरिकांच्या संतापाला महापालिकेला पुढे जावे लागले. हा अनुभव बघता मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी आज मेट्रो रेल्वेला मेट्रो मार्गावरील ड्रेनेज लाईन (पावसाळी नाली) स्वच्छ करण्याच निर्देश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागालाही रिंग रोडलगतच्या पावसाळी नाल्याच्या सफाईची जबाबदारी देण्यात आली.

शहरातील नाग, पिवळी व पोरा नदीच्या स्वच्छतेसंबंधी तसेच पावसाळी नाल्या, शहरातील नाले सफाईच्या कामांचा आयुक्त अभिजित बांगर यांनी आज आढावा घेतला. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी स्वच्छता डॉ. सुनील कांबळे, कार्यकारी अभियंता मोती कुकरेजा, सतीश नेरळ, अमीन अख्तर, राजेंद्र रहाटे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे अधिकारी उपस्थित होते. शहरात पावसाळ्यापूर्वी नदी, नाले, ड्रेनेज लाइन स्वच्छतेच्या कामाने वेग घेतला आहे. नदी स्वच्छता अभियानांतर्गत तिन्ही नद्या शहराबाहेर पाच किमीपर्यंत स्वच्छ करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्यासाठी अतिरिक्त पोकलेन व मनुष्यबळ उपलब्ध करून द्या, अशी सूचनाही त्यांनी केली. नाग नदी, पिवळी नदी, पोरा नदीअंतर्गत दहाही स्ट्रेचमध्ये स्वच्छतेचे कार्य सुरू आहे. दहाही स्ट्रेचमध्ये पोकलेन लागले असून, आवश्‍यकता भासल्यास मनुष्यबळाच्या माध्यमातूनही सफाई सुरू आहे. पिवळी नदीचा बराचसा भाग स्वच्छ करण्याची जबाबदारी नागपूर सुधार प्रन्यासने उचलली असून त्या कामालाही सुरुवात झाली असल्याचे यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. नदी स्वच्छता अभियानांतर्गत ज्या-ज्या अधिकाऱ्यांची जी जबाबदारी आहे, ती त्यांनी चोखपणे पार पाडावी. दररोज अहवाल सादर करावा, असे निर्देशही आयुक्तांनी दिले.
आयुक्ताचे नागरिकांना आवाहन
नागपूर शहरातील नदी स्वच्छता अभियान हे लोकअभियान आहे. नाग नदीसह अन्य नद्या स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी नद्यांमध्ये कचरा टाकू नये, स्वच्छता अभियानात आपापल्या परीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयुक्त बांगर यांनी केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cleanliness of drainage line by Metro, PWD