सावित्रीच्या लेकीच्या हाती स्वच्छतेचा डोलारा

File photo
File photo

नागपूर : स्वच्छता! शब्द वाचताच मनात सौंदर्य फुलते. स्वच्छतेने मन प्रसन्न राहते. या स्वच्छतारूपी सौंदर्याची आराधना करण्याची सवय अंगी बाळगण्याचा पहिला सुविचार शाळेच्या भिंतीवरून मिळतो. परंतु, मेडिकल मागील 60 वर्षांत कधीच स्वच्छ नव्हते. नाकाला रुमाल लावल्याशिवाय प्रवेश करणे कठीण होते. कधी नव्हे, ते मेडिकल "स्वच्छ' झाले. याचे श्रेय जाते मेडिकलमधील पहिली महिला स्वच्छता निरीक्षक निशा भाटी यांच्याकडे. ही सावित्रीची लेक साडेचारशेवर कामगारांचे नेतृत्व करीत आहे. मेडिकल स्वच्छ करण्याचा नियोजित आराखडा ठरवून देते. विशेष असे की, मेडिकलच्या स्थापनेनंतर प्रथमच स्वच्छता निरीक्षकपदावर महिलेची नियुक्ती झाली.
मेडिकल 210 एकरांत विस्तारले आहे. 50 वॉर्ड, सात ऑपरेशन थिएटरसह किचन, महाविद्यालय, रुग्णालय, भावी डॉक्‍टरांचे वसतिगृह, औषधालयासह बाह्य परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी येथील स्वच्छता निरीक्षकांची आहे. मेडिकलची स्वच्छता हा एक स्वतंत्र विषय होता. गेल्या साठ वर्षांत मेडिकल स्वच्छ नसल्यामुळे प्रशासनावर वृत्तपत्रांमधून नेहमीच सडेतोड टीका केली जात असे. याची दखल घेत उच्च न्यायालयात मेडिकलच्या अस्वच्छतेसंदर्भात याचिका दाखल केली गेली. नेमक्‍या अशा कठीणसमयी एका महिलेची येथे नियुक्ती झाल्यामुळे मेडिकल स्वच्छ होईल का? अशी शंका मनात सारेच व्यक्त करीत होते. परंतु, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे आणि मेडिकलमधील स्वच्छता निरीक्षक यांची स्वतंत्र बैठक झाली. मेडिकलच्या स्वच्छतेचे आव्हान पेलवण्याचे विविध उपक्रम राबवण्याचा मंत्र भाटी यांनी दिला. त्याचे योग्य नियोजन करण्यात आले. कधी नव्हे, ते मेडिकल स्वच्छ झाले, अशा शेरा उच्च न्यायालयाने दिला. मेडिकलची स्वच्छतेचे निरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र पथक लावण्यात आले होते. पथकाने मेडिकलचे निःपक्षपणे मूल्यांकन केले. सावित्रीच्या लेकीने अधिष्ठातांच्या नियोजनाप्रमाणे येथील सहकारी नरसिंग देवरवाड, संकेत सालनकर यांच्या मदतीने मेडिकल स्वच्छतेची मोहीम फत्ते केली.
स्वच्छतेकडून सौंदर्याकडे
स्वच्छता निरीक्षकपदासाठी 12 वी विज्ञान ही पात्रता आहे. मात्र, मेडिकलच्या या सावित्रीच्या लेकीकडे रसायनशास्त्रामध्ये "एमएससी'ची पदव्युत्तर पदवी आहे. सोबतीला "बीएड' आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू होती. सरकारने 2014 मध्ये स्वच्छतेचा नारा दिला आणि निशा भाटी यांनी स्वच्छता व आरोग्य निरीक्षकाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. सुदैवाने वैद्यकीय शिक्षण विभागात स्वच्छता निरीक्षकांची जाहिरात प्रकाशित झाली. लेखी परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्यानंतर त्यांची या पदावर नियुक्ती झाली. येथे पदस्थापना मिळाली त्याचवेळी स्वच्छतेतून सौंदर्याकडे नेण्याचा संकल्प निशा भाटी यांनी केला होता.
रुग्णालयातील स्वच्छता आवश्‍यक आहे. स्वच्छता ठेवली, तर 50 टक्के आरोग्य सुदृढ असते. मेडिकल स्वच्छ ठेवणे सर्वांची जबाबदारी आहे. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी मेडिकल स्वच्छ करण्याचा संकल्प केला आणि "स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिद्धी' यानुसार काम केले. मेडिकल स्वच्छ झाले.
-निशा भाटी, स्वच्छता निरीक्षक, मेडिकल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com