आरटीओ कार्यालयातील लिपिकास लाच घेताना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

अमरावती : येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वरिष्ठ लिपिकास तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता. पाच) सायंकाळी रंगेहात पकडले.

अमरावती : येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वरिष्ठ लिपिकास तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता. पाच) सायंकाळी रंगेहात पकडले.
नितीन येल्लाराव मुखे (वय 41), असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे. पीयूसी सेंटर चालविणाऱ्या व्यक्तीने नूतनीकरण करण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडे अर्ज सादर केला होता. नूतनीकरणाचे काम लिपिक मुखे याच्याकडे होते. त्यासाठी सदर व्यक्तीकडे हे काम तातडीने करून देण्याकरिता त्याने चार हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती तीन हजार रुपयांत काम करण्याचे ठरले. परंतु, पैसे देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीने नजीकच्याच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार केली होती. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे परिसरातच एसीबी अमरावतीच्या पथकाने सापळा रचला. तीन हजार रुपये घेताना लिपिक नितीन मुखे यास अटक केली. त्याच्याविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक रवींद्र जेधे, शिपाई शैलेश कडू, पंकज बोरसे, सहायक पोलिस उपनिरीक्षक सतीश किटुकले यांचे पथक कारवाईत सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Clerk in RTO office caught for bribe