हवामान विभागाचे संकेतस्थळ तीन दिवसांपासून बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

गेल्या तीन दिवसांपासून सर्वसामान्य नागरिकांसह प्रसारमाध्यमेही सविस्तर माहितीपासून वंचित आहेत. त्यामुळे तापमानाविषयीची माहिती दुरध्वनीवर संपर्क साधून कर्मचाऱ्यांना विचारावी लागत आहेत

नागपूर - प्रादेशिक हवामान विभागाचे संकेतस्थळ गेल्या तीन दिवसांपासून बंद असल्यामुळे भर उन्हाळ्यात तापमान व हवामानाविषयी माहिती मिळविण्यापासून विदर्भातील नागरिक वंचित आहेत. संकेतस्थळ कुणीतरी "हॅक' केल्याचीही चर्चा आहे.

हवामान विभागाच्या संकेतस्थळावर विदर्भातील विविध शहरांचे दैनंदिन तापमान तसेच हवामानाविषयीचे अंदाज वर्तविले जातात. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सर्वसामान्य नागरिकांसह प्रसारमाध्यमेही सविस्तर माहितीपासून वंचित आहेत. त्यामुळे तापमानाविषयीची माहिती दुरध्वनीवर संपर्क साधून कर्मचाऱ्यांना विचारावी लागत आहेत.

यासंदर्भात हवामान विभागाचे संचालक अविनाश ताठे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, दोन-तीन दिवसांपासून संकेतस्थळात तांत्रिक बिघाड आहे. दुरुस्तीचे काम सुरू असून, ती लवकरच सुरू होईल, अशी आशा त्यांनी व्यक्‍त केली. ते म्हणाले, दिल्लीस्थित नागपूर इन्फॉर्मेटिक्‍स सेंटर (एनआयसी)तर्फे वेबसाईटचे संचालन होते. आम्ही केवळ त्यावर हवामानाविषयीचा डाटा अपलोड करतो. वेबसाईट "हॅक' झाल्याच्या चर्चेबद्‌दल विचारले असता ते म्हणाले, एनआयसीतर्फे तसे सांगण्यात येत असले तरी, त्याबद्‌दल आम्ही ठामपणे काहीच सांगू शकत नाही.

Web Title: climate department's website hacked?