मुख्यमंत्र्यांच्या अर्जावरील सर्व आक्षेप फेटाळले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

नागपूर  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्जावरील आक्षेप पावणेदोन तास चाललेल्या सुनावणीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावत त्यांचा अर्ज वैध ठरवला. मात्र, आक्षेप फेटाळून मुख्यमंत्र्यांचा अर्ज मंजूर केल्यानंतर विरोधकांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवीत तहसील कार्यालय परिसरात सरकार व प्रशासनाविरोधात नारेबाजी केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपुरातील दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज सादर केला. त्यांच्या अर्जात अपूर्ण माहिती असून, शपथपत्रावरील नोटरीचा शिक्का हा मुदतबाह्य असल्याचा आक्षेप आज विरोधकांनी घेतला. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावरील थकबाकीची माहिती अर्जात नाही, असाही आक्षेप घेण्यात आला. कॉंग्रेसचे उमेदवार आशीष देशमुख, अपक्ष उमेदवार प्रशांत पवार तसेच "आप'चे उमेदवार अमोल हाडके यांनी हरकत घेत मुख्यमंत्र्यांचा अर्ज रद्द करण्याची मागणी केली. त्यावर दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शेखर घाडगे यांच्यापुढे दुपारी चार वाजता सुनावणी सुरू झाली. या वेळी सर्व तक्रारदार व त्यांचे वकील ऍड. सतीश उके तर देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने ऍड. उदय डबले आणि संदीप जोशी यांनी बाजू मांडली. जवळपास पावणेदोन तास सुनावणी चालली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर घाडगे यांनी विरोधकांच्या सर्व तक्रारी फेटाळून लावत अर्ज स्वीकृत केला. 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनावणीत चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. अर्ज स्वीकारल्याने विरोधकांनी निषेध व्यक्त केला. हुकूमशाही, तानाशाही मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cm, electon applicaton approved