नागपूरसाठी मुख्यमंत्र्यांनी दिले शंभरचे टार्गेट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जानेवारी 2017

नागपूर : नाशिक महापालिकेत दहा वर्षे अपक्ष सदस्यांच्या कुबड्यांवर सत्ता उपभोगणाऱ्या भाजपने यंदा नगरसेवकांची शंभरी गाठण्याचा संकल्प केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे घरचे मैदान असल्याने भाजपला यंदा कुठलीही जोखीम पत्कारायची नाही. दुसरीकडे महापालिकेत परत सत्तेवर येण्याची धडपड कॉंग्रेसची सुरू आहे. मात्र बड्या नेत्यांची गटबाजी काही कमी होत नसल्याने शहराध्यक्ष विकास ठाकरे चांगलेच वैतागले आहेत.

नागपूर महापालिका 38 प्रभाग आणि 152 सदस्यांची झाली आहे. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, सहा विधानसभेचे आमदार यांच्यासह एक राज्यसभा सदस्य, तीन विधान परिषद असा मोठा फौजफाटा भाजपकडे आहे. याशिवाय महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष यांच्यासह 80 नगसेवकांची फळी सध्या उपलब्ध आहे. पाच वर्षे काय केले, जनतेला सांगण्यासाठी भरपूर मुद्दे आहेत. दोन्ही नेत्यांनी मोठेमोठे प्रकल्प नागपूरला खेचून आणले. सर्व प्रमुख व वर्दळीचे रस्ते कॉंक्रीटचे केले जात आहेत. केंद्र व राज्याच्या निधीमुळे रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. अनेक बड्या कंपन्या नागपूरमध्ये गुंतवणूक करीत आहेत. दर्जेदार शिक्षण संस्था सुरू झाल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून शहराच्या विकासाने झपाट्याने वेग पकडला आहे. या भाजपच्या जमेच्या बाजू असल्या, तरी दीडशे जागांसाठी तब्बल तीन हजार इच्छुकांनी दावा केला आहे. यामुळे उमेदवार निवडताना भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे. अनेकांची नाराजी ओढावून घ्यावी लागेल, तसेच बंडखोरांचाही सामना करावा लागणार आहे.

कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे पक्ष कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करीत आहेत. मात्र माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनिस अहमद यांचे त्रिकूट त्यांना नेता मानायला तयार नाहीत. प्रदेशाध्यक्षांनाही त्यांनी जुमानले नाही. यामुळे कॉंग्रेसला आता नशीबच तारू शकते, इतकी परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. सहा सदस्यांची राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटली आहे. शिवसेनेचे दोन नगरसेवक कॉंग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. युती आणि आघाडी होण्याची शक्‍यता फारशी नाही. चार वॉर्डांच्या प्रभागात चार सक्षम उमेदवार दोन्ही पक्षांकडे नाहीत. यामुळे शहरातून दोन्ही पक्षांचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्‍यता दिसते. बसपाची मतपेढी मर्यादित आहे. रिपब्लिकन पक्षाची शकले झाली असल्याने भाजप आणि कॉंग्रेस या दोन पक्षांमध्येच महापालिकेची निवडणूक होणार आहे.

Web Title: cm fadnavis sets target of hundred for nagpur