Video : भाजपचे हिंदुत्त्व बुरखाधारी : उद्धव ठाकरे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 डिसेंबर 2019

मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून हल्ला चढविला. ते म्हणाले, पाकिस्तान, बांगलादेशसह अखंड हिंदुस्थानचे वीर सावरकरांचे स्वप्न होते. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठीच भाजपसोबत युती केली होती. त्यांच्या स्वप्नाबाबत कुणीही बोलत नाही अन्‌ आम्हाला शेतकऱ्यांबाबत आमचे शब्द, वचने याचे स्मरण करून देत आहेत.

नागपूर : आम्ही हिंदुत्त्ववादी आहोतच. आम्ही धर्मांतर केलेले नाही. 2014 मध्ये युती तोडली तेव्हाही आम्ही हिंदूच होतो. परंतु, हिदुत्त्वाचा बुरखा घालून कुणी देशाच्या मुळावर घाव करीत असेल तर आमचे हिंदुत्त्व त्याला माफ करणार नाही, अशा शब्दात शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर तोंडसुख घेतले. वीर सावरकर यांच्या अखंड हिंदुस्थानच्या स्वप्नाबाबत कुणीही बोलत नसल्याचे नमूद करीत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केले. 

रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित विदर्भस्तरीय शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार भावना गवळी, खासदार कृपाल तुमाने, खासदार गजानन कीर्तीकर, खासदार प्रतापराव जाधव, आमदार दिवाकर रावते, परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार आशिष जयस्वाल, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी, सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांच्यासह अनेक नेते, जिल्हाप्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते. 

Image may contain: 9 people, people smiling
उपस्थित शिवसैनिक

सेनेच्या मेळाव्यात पंतप्रधान मोदींवरही टीका 
मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून हल्ला चढविला. ते म्हणाले, पाकिस्तान, बांगलादेशसह अखंड हिंदुस्थानचे वीर सावरकरांचे स्वप्न होते. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठीच भाजपसोबत युती केली होती. त्यांच्या स्वप्नाबाबत कुणीही बोलत नाही अन्‌ आम्हाला शेतकऱ्यांबाबत आमचे शब्द, वचने याचे स्मरण करून देत आहेत.

आमचे शब्द, वचने आमच्या अंगावर फेकताना "अच्छे दिन'बाबत तुमची बोलती का बंद होते? असा सवाल करीत त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढविला. आमचे शब्द आम्हाला स्मरण करून देण्याची गरज नाही, आम्हाला स्मृतीभ्रंश झाला नाही, आम्ही जे बोलतो, ते करतो, असेही ते म्हणाले.

महत्त्वाची बातमी - हिवाळी अधिवेशन : ही ब्रिटिशांची विधानसभा आहे का? : देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी शेजारी देशातील हिंदू अल्पसंख्यांकांच्या छळावरून त्या देशांना इशारा देतील, अशी अपेक्षा होती. पण तेथील हिंदूंना येथे आणण्याची भाषा करतात. तेथील हिंदुंना आणा, परंतु त्यांचे पुनर्वसन कुठे करणार? बाहेरच्या हिंदुंचा कळवळा आहे. मग देशातील, कर्नाटकातील नागरिक महाराष्ट्रात सामील होण्यासाठी टाहो फोडतात, ते हिंदू नाहीत काय? राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आहे. याबाबत निर्णय का घेत नाही. शिवसेना काय आहे, हे कुणी सांगायची गरज नाही, आम्ही मुखवटा घातला नाही. नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत विचारले तर पाकिस्तानची भाषा बोलत असल्याची टीका केली जाते. पाकिस्तान जगाच्या नकाशावरून नष्ट का करीत नाही, असे नमूद करीत त्यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM uddhav thakrey target central government over hindutva