प्रशिक्षकांच्या चुकीचा ऍथलिट्‌सना फटका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

नागपूर  : राज्य व राष्ट्रीय ऍथलेटिक्‍स स्पर्धांसाठी असलेली तारीख (कट ऑफ डेट) विचारात न घेता केवळ पदके जिंकून वाहवा मिळवून घेण्याच्या उद्देशाने युवा ऍथलिट्‌सला अंधारात ठेवण्याची चूक आता प्रशिक्षकांना महागात पडणार आहे. नुकत्याच झालेल्या नागपूर जिल्हा ज्युनियर ऍथलेटिक्‍स स्पर्धेत सुवर्ण किंवा रौप्यपदके जिंकूनही केवळ तांत्रिकदृष्ट्या "ओव्हरएज' असल्यामुळे जवळ-जवळ बारा ते पंधरा ऍथलिट्‌सवर आगामी राज्य स्पर्धेपासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.

नागपूर  : राज्य व राष्ट्रीय ऍथलेटिक्‍स स्पर्धांसाठी असलेली तारीख (कट ऑफ डेट) विचारात न घेता केवळ पदके जिंकून वाहवा मिळवून घेण्याच्या उद्देशाने युवा ऍथलिट्‌सला अंधारात ठेवण्याची चूक आता प्रशिक्षकांना महागात पडणार आहे. नुकत्याच झालेल्या नागपूर जिल्हा ज्युनियर ऍथलेटिक्‍स स्पर्धेत सुवर्ण किंवा रौप्यपदके जिंकूनही केवळ तांत्रिकदृष्ट्या "ओव्हरएज' असल्यामुळे जवळ-जवळ बारा ते पंधरा ऍथलिट्‌सवर आगामी राज्य स्पर्धेपासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य संघटनेने जून महिन्यात 14 वर्षांखालील गटासाठी पात्रता वय 7 नोव्हेंबर 2005 ते 6 नोव्हेंबर 2007, 16 वर्षे वयोगटासाठी 7 नोव्हेंबर 2003 ते 6 नोव्हेंबर 2005, 18 वर्षे वयोगटासाठी 7 नोव्हेंबर 2001 ते 6 नोव्हेंबर 2003 आणि 20 वर्षे वयोगटासाठी 7 नोव्हेंबर 1999 ते 6 नोव्हेंबर 2001 राहील असे कळविले होते. ही तारीख विचारात न घेता अनेकांनी संबंधित गटात भाग घेऊन पदके जिंकली. स्पर्धेच्या तांत्रिक व्यवस्थापकांनीही याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे काही पदकविजेते खेळाडू संबंधित वयोगटांत असले तरी, राज्य संघटनेने कळविलेल्या तारखेनुसार अपात्र ठरतात. त्यामुळे पदक जिंकूनही नाइलाजाने त्यांना राज्य स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. 18 व 20 वर्षांखालील स्पर्धा येत्या 10 व 11 ऑगस्टला सांगली येथे, तर 14 व 16 वर्षांखालील राज्य स्पर्धा डेरवन येथे होणार आहे.
या प्रकारासाठी मुख्यत्वे खेळाडू कारणीभूत असले तरी, त्यांचे प्रशिक्षक व शाळांचे क्रीडा शिक्षकही तितकेच जबाबदार आहेत. जिल्हा स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यासाठी अनेक प्रशिक्षक नियमांबाबत युवा खेळाडूंना "कट ऑफ डेट'विषयी अंधारात ठेवून मैदानात उतरवितात. त्यांनी जाणीवपूर्वक ही चूक केली आहे. खेळाडूंना चुकीचे मार्गदर्शन केले. वास्तविक पाहता पात्रता वयात बसणाऱ्या खेळाडूंनाच प्रशिक्षकांनी खेळविणे आवश्‍यक आहे. दुर्दैवाने यावेळच्या जिल्हा स्पर्धेच्या वेळी हे घडले नाही. त्यांच्या चुकीचा फटका अनेक युवा खेळाडूंना बसणार आहे. "कट ऑफ डेट'चा सर्वाधिक फटका जिल्हा स्पर्धेतील विजेता प्रो-हेल्थ फाउंडेशन, ट्रॅकस्टार ऍथलेटिक्‍स क्‍लब आणि विद्यार्थी युवक क्रीडा मंडळाच्या खेळाडूंना बसणार असल्याची माहिती आहे. नागपूर जिल्हा ऍथलेटिक्‍स संघटना याविषयी कडक धोरण स्वीकारत नाही, त्यामुळे असे प्रकार घडत असल्याचे काही प्रशिक्षकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात संघटनेने कठोर होणे आवश्‍यक आहे.
"स्पर्धेपूर्वी जिल्हा संघटना "सर्क्‍यूलर' काढून "कट ऑफ डेट'विषयी माहिती उपलब्ध करून देते. मात्र, काही प्रशिक्षक व क्रीडा शिक्षक त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. सर्वकाही माहीत असूनही स्पर्धेला व खेळाडूंना गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे नाइलाजाने युवा खेळाडूंना फटका बसतो. प्रशिक्षकांनी खेळाडूंना अचूक माहिती देऊन तारखेत बसणारे खेळाडूच मैदानात उतरवायला पाहिजे.'
-डॉ. शरद सूर्यवंशी (सचिव, नागपूर जिल्हा ऍथलेटिक्‍स संघटना)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coach wrong athletes hit