डॉक्‍टर व रुग्ण यांच्यातील दुरावा व्हावा कमी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

नागपूर - आरोग्यविषयक शिक्षणाचा अद्याप अभाव आहे. तळागळातील लोकांपर्यंत ते पोहोचलेले नाही. याला काही प्रमाणात जनजागृतीसह डॉक्‍टर आणि रुग्ण यांच्यातील संवादाचा दुरावा हेदेखील कारणीभूत आहे. हा दुरावा कमी झाल्यास वेळीच प्रतिबंधात्मक होण्यास मदत होईल, असे मत वैद्यकीयतज्ज्ञांनी व्यक्‍त केले. 

नागपूर - आरोग्यविषयक शिक्षणाचा अद्याप अभाव आहे. तळागळातील लोकांपर्यंत ते पोहोचलेले नाही. याला काही प्रमाणात जनजागृतीसह डॉक्‍टर आणि रुग्ण यांच्यातील संवादाचा दुरावा हेदेखील कारणीभूत आहे. हा दुरावा कमी झाल्यास वेळीच प्रतिबंधात्मक होण्यास मदत होईल, असे मत वैद्यकीयतज्ज्ञांनी व्यक्‍त केले. 

"कॉफी विथ सकाळ'मध्ये वैद्यकीयतज्ज्ञांसोबत आरोग्यविषयक विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. कॅन्सरतज्ज्ञ डॉ. अजय मेहता, साधना चॅरिटेबल ट्रस्टच्या सुचिता मेहता, रक्तविकारतज्ज्ञ डॉ. रिया बालीकर व कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयप्रकाश बारस्कर, मलय घोडीचोरे उपस्थित होते. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आयुर्मानावर होत आहे. व्यसनाधीनतेचे प्रमाणही वाढत आहे. त्यातूनच कॅन्सरसारख्या आजारांमध्ये वाढ होत आहे. 

गुटखा, तंबाखू सेवनाचे आरोग्यावर कोणते विपरीत परिणाम होतात, याची माहिती अनेकांना नाही. ते लोकांना सांगण्याची गरज आहे. महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, भविष्याच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. ब्रेस्ट कॅन्सर उपचारानंतर आटोक्‍यात येऊ शकतो. परंतु, त्यासाठी वेळीच उपचाराची गरज आहे. कॅन्सरची लक्षणे कोणती, त्यावर प्रतिबंधात्मक उपचार उपलब्ध आहेत, याची माहिती माध्यमे आणि आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविल्यास कॅन्सरसारख्या आजारांना प्रतिबंध लावणे शक्‍य असल्याचे सांगितले. मुलींना नवव्या वर्षीदेखील कॅन्सर होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मात्र ते होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहेत. परंतु, त्याची माहिती अद्याप लोकांना नसल्याने हा आजार वाढत जातो. तीच स्थिती ब्लड कॅन्सरबाबत आहे. या आजारासंदर्भातदेखील गैरसमज अधिक असल्याने उपचारासाठी सहजपणे कुणी पुढे येत नाही. हा गैरसमज दूर करण्याची आणि यावर उपलब्ध असलेल्या उपचार पद्धतीची माहिती त्यांना देणे गरजेचे आहे. एकंदरीत आरोग्य शिक्षणाची गरज असल्याचे सांगितले. 

जीवनदायी योजना चांगली 
सरकारतर्फे आरोग्यविषयक उपचारासाठी राबविली जाणारी राजीव गांधी जीवनदायी योजना चांगली आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना वेळीच उपचार घेण्यास मदत होते. परंतु, यात निदान करण्यासाठी करावा लागणारा खर्च मिळण्याची तरतूद केल्यास त्याची अधिक मदत होऊ शकेल, असे मत वैद्यकीयतज्ज्ञांनी व्यक्‍त केले. 

वैद्यकीय साधनाच्या किमतीवर असावे नियंत्रण 
वैद्यकीय साधनाच्या किमती अव्वाच्या सव्वा आहेत. त्यामुळे त्याचा भुर्दंड गरीब रुग्णांना सहन करावा लागतो. त्यामुळे सरकारने या साधनावरील किमती आटोक्‍यात ठेवण्यासाठी कायदा केल्यास त्याची बरीच मदत होऊ शकते. 

तष्निकाचा उपक्रमात सहभाग 
येत्या मार्चपासून तष्निकातर्फे तष्निकांसाठी विदर्भभर "कर्करोग जनजागृती आणि तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. त्यामध्ये डॉक्‍टारांची ही चमू सहभागी होणार आहे.

Web Title: coffee with sakal