पूर्वेकडील वाऱ्यांमुळे थंडी पळाली 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

नागपूर - उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू असली की, विदर्भात थंडीची लाट येते. मात्र, या वेळी पूर्वेकडील वाऱ्याने अनपेक्षित प्रवेश करून थंडीचा प्रभाव कमी केला. हे वातावरण आणखी दोन-तीन दिवस कायम राहणार असून, त्यानंतर गारठा वाढण्याची शक्‍यता आहे. 

प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्‍मीर, हिमाचल प्रदेशसह उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी व काही भागांत अवकाळी पाऊस सुरू आहे. बर्फवृष्टीनंतर उत्तरेकडील गारठायुक्‍त वारे (नॉर्दर्न विंड) उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमार्गे विदर्भाच्या दिशेने येतात. त्यामुळे विदर्भात थंडीच्या लाटेसदृश वातावरण निर्माण होते. मात्र, यावेळी उत्तरेकडील वाऱ्यांऐवजी पूर्वेकडील वारे येताहेत. त्यामुळेच थंडीचा प्रभाव कमी होऊन वातावरणात सुखद बदल झाला आहे. दोन-तीन दिवसांपासून पारा सातत्याने वर सरकतो आहे. बुधवारी शहराचे किमान तापमान सरासरीइतके म्हणजेच 13.6 अंशांवर गेले. कमाल तापमानातही 30 अंशांपर्यंत वाढ झाली. विदर्भातील बहुतांश शहरांमध्ये तापमान 13 ते 18 अंशांदरम्यान नोंदले गेले. उल्लेखनीय म्हणजे, पाच दिवसांपूर्वी (13 जानेवारीला) नागपुरात पाऱ्याने (7.2 अंश सेल्सिअस) या मोसमातील नीचांक गाठला होता. त्यामुळे दिवसाही गारठा वाटत होता. मात्र, बुधवारी दिवसभर गरमीसारखे वातावरण होते. त्यामुळे पंखे पुन्हा गरगरू लागले.

Web Title: cold east wind