थंडीत दारू तर उन्हाळ्यात थंड बिअरचा उतारा

beer
beer

नागपूर ः देशी असो की विदेशी, थंडीत सर्वाधिक मागणी दारूला असून उन्हाळ्यात मात्र बिअरचा उतारा शोधणारे नागपूरकर दररोज सरासरी एक लाख 14 हजार लिटर देशी-विदेशी दारू तर 26 हजार 940 लिटर बिअर रिचवतात. थंडीत दारू तर उन्हाळ्यात बिअर दररोज यापेक्षा जास्त घेतली जात असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले. विशेष म्हणजे "भर गिलास, कर खल्लास' म्हणणाऱ्या "देशी'च्या चाहत्यांची यात मोठी संख्या आहे.

दारू, बिअर सध्या सामाजिक जीवनाचा भाग आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. "छलकाये जाम' म्हणत कधी बार तर कधी घरीही "बसणारे' दररोज लाखावर लिटर दारू घेत आहेत. मागील 2018-19 या वर्षात नागपूर जिल्ह्यातील शौकिनांनी 4 कोटी 19 लाख 18 हजार 155 लिटर दारू पोटात रिचवली. नुकतेच मिसरुड फुटलेले तरुण किंवा कुटुंबाच्या दडपणामुळे केवळ बिअरवर तहान भागविणाऱ्यांनी 98 लाख 33 हजार 212 लिटर बिअर फस्त केली. संपूर्ण वर्षात दररोज विकली जाणारी दारू तसेच डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या थंडीच्या महिन्यांमध्ये विकल्या जाणाऱ्या दारूच्या सरासरीत बरीच तफावत आहे. मागील संपूर्ण वर्षात दररोजची सरासरी काढल्यास नागपूरकर 1 लाख 14 हजार 844 लिटर दारू पितात. डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या तीन महिन्यातील दररोजची सरासरी 1 लाख 16 हजार लिटर आहे. अशीच वाढ बिअरच्या बाबतीतही दिसून येते. नागपूरकरांनी मागील वर्षात दररोज सरासरी 26 हजार 940 लिटर बिअर घेतली. मात्र, यंदा 2019-20 मधील एप्रिल, मे, जून या कडक उन्हाच्या महिन्यांमध्ये दररोज 45 हजार 220 लिटर बिअर विकली गेली. अर्थात देशी, विदेशी दारूचा खप थंडीत अधिक असून उन्हाळ्यात बिअरला पसंती देणारे अधिक असल्याचे यातून अधोरेखित झाले. विशेष म्हणजे यात "देशी'च्या शौकिनांची संख्या अधिक आहे. मागील वर्षात 2 कोटी 91 लाख 38 हजार 64 लिटर देशी दारूची विक्री करण्यात आल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले. त्या तुलनेत भारतीय बनावटीची विदेशी दारू 1 कोटी 26 लाख 10 हजार 811 लिटर विकली गेली तर वाइन केवळ 1 लाख 69 हजार 280 लिटर विकण्यात आली.

दरवर्षी वाढतोय दारूचा महापूर
गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीवरून शहरात दरवर्षी "पिणाऱ्यांच्या' संख्येत वेगाने वाढ होत आहे. विशेष म्हणजे यावर मंदी आदीचा कुठलाही परिणाम होताना दिसत नाही. 2017-18 या वर्षात शहर व जिल्ह्यात 3 कोटी 57 लाख 15 हजार 16 लिटर देशी, विदेशी, वाइन आदी प्रकारांतील दारू विक्री झाली. 2018-19 या वर्षात 4 कोटी 19 लाख 18 हजार 155 लिटर दारू विकण्यात आली. बिअरचेही चाहते दरवर्षी वाढत आहेत.

महसुलात 28 टक्‍क्‍यांनी घट
दारू विक्रीतून उत्पादन शुल्क विभाग कोट्यधीश होत आहे. मात्र, 2017-18 या वर्षातील महसुलाच्या तुलनेत 2018-19 या वर्षाच्या महसुलात 28.60 टक्‍क्‍यांनी घट झाली. 2017-18 या वर्षात 660 कोटी 54 लाखांचा महसूल जमा झाला. मात्र, 2018-19 या वर्षात 471 कोटी 63 लाखांपर्यंत मजल मारणे उत्पादन शुल्क विभागाला शक्‍य झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com