थंडी म्हणते...मी पुन्हा येईन!

अनुप ताले
बुधवार, 4 डिसेंबर 2019

  • पुढच्या आठवड्यात थंडीचा लाट
  • पारा 10 अंशाखाली जाण्याचे संकेत
  • जानेवारीत पावसाचीही शक्यता
  • वादळ निर्मितीमूळे वातावरणात बदल

अकोला : गत आठवड्यात पारा 14 अंशाखाली गेल्याने हिवाळ्याची चुनुक जाणवायला लागली होती. परंतु, अचानक वातावरणात बदल होऊन किमान तापमान 17 अंशापार गेले. पुढच्या आठवड्यात मात्र, ‘थंडी...पुन्हा येणार’, असे संकेत देण्यासोबतच पारा 10 अंशाखाली जाण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

उन्हाळा तसेच पावसाळ्यातही यावर्षी ऋतूचक्रातील बदलाचा परिणाम दिसून आला. जवळपास जुलै अखेरपर्यंत तापमानाचा जोर व उन्हाचा तडाखा अकोलेकरांना सहन करावा लागला. ऑक्टोबरमध्येही उन्हाची तिव्रता अधिक होती तर, अजूनही कमाल तापमान 32 अंशाहून अधिक आहे. एरव्ही पावसाळ्याची सुरुवात जूनच्या पहिल्या आठवड्यात होते आणि ऑगस्टच्या शेवटच्या किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून परततो. यंदा मात्र जुलैल्या दुसऱ्या आठवड्यात मॉन्सूनचे आगमन झाले आणि ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाने अकोलेकरांसह वैदर्भियांना झोडपून काढले. जमिनीत पावसाचा वाफसा व्हायला मोठा कालावधी लागल्याने आणि वातावरणातील आर्द्रतेचा टक्काही अधिक राहल्याने, दसरा, कोजागिरी पौणिर्मेला अनुभवाला येणारी थंडी अजूनपर्यंत अनुभवता येऊ शकली नाही. 

रविवारपासून थंडीत वाढ
नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात किमान तापमानाचा पारा 14 अंशापर्यंत घसरून हिवाळ्याची सुरुवात झाल्याचा अनुभव अकोलेकरांनी घेतला. परंतु, चवथ्या आठवड्यात अचानक हवामानात बदल होऊन काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि किमान तापमानात पुन्हा वाढ होऊन पारा 17 अंशापार गेला. त्यामुळे हिवाळ्यातील कडाक्याची व गुलाबी थंडी अजूनपर्यंत अकोलेकरांना अनुभवता आली नाही. सध्याही महाराष्ट्राच्या दक्षिनेकडे पावसाचे सावट असून, काही भागात पावसाने हजेरी सुद्धा लावली आहे. त्याचा परिणाम होऊन विदर्भातही आर्द्रता वाढत असल्याने, तापमानात काही अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु, 8 डिसेंबरपासून पुन्हा पारा घसरायला सुरुवात होऊन, थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

जानेवारीत पावसाचीही शक्यता
जम्मू काश्मिर भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. त्याचा परिणाम तीन ते चार दिवसात भोपाळ व नंतर दोन दिवसात महाराष्ट्रात आणि विदर्भात दिसून येईल. त्यामुळे 8 डिसेंबरपासून विदर्भात पारा घसरायला सुरुवात होऊन, किमान तापमान 10 अंशाखाली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण टोकात, परभणी पर्यंत पावसाचे सावट आहे. परंतु, विदर्भात शक्यता दिसत नाही. जानेवारीमध्ये मात्र जिल्ह्यासह विदर्भात पाऊस पडू शकतो.
- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर

यामुळे हवामानात झाला बदल
सध्या तामिळनाडू भागात मॉन्सून सक्रीय आहे. परंतु, कर्नाटक भागातील यमन आणि उमन जवळ तसेच केरळच्या पश्चिम किनाऱ्याजवळ वादळ तयार झाले आहे. त्यामुळे केरळ, कर्नाटकसह महाराष्ट्रातील दक्षिण टोक म्हणजे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग तसेच उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी परिसरात आर्द्रता वाढली असून, वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. याचाच परिणाम विदर्भात काही प्रमाणात होऊन ढगाळ वातावरण व गर्मीचे प्रमाण वाढले आहे. दोन ते तीन दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यतासुद्धा हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cold says ... I'll be back