बोचऱ्या थंडीने नागपूरकर हैराण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

विदर्भातील पारा 
(अंश सेल्सिअसमध्ये) 
शहर पारा 
अकोला 8.0 
अमरावती 8.4 
यवतमाळ 8.4 
गोंदिया 8.5 
नागपूर 8.6 
बुलडाणा 8.8 
वाशीम 9.0 
वर्धा 9.8 
ब्रह्मपुरी 10.9 
चंद्रपूर 11.2 

नागपूर - उत्तर भारतात सुरू असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे विदर्भात थंडीची तीव्र लाट आली आहे. गारठ्यामुळे नागपूरचा पारा गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल पाच अंशांनी घसरला असून, तो आणखी खाली येण्याची शक्‍यता प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली. 

हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्‍मीर, शिमलासह उत्तर भारतातील बहुतांश भागातील शहरांमध्ये सध्या बर्फवृष्टी सुरू आहे. त्याचा सर्वाधिक प्रभाव मध्य भारतातील मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात जाणवत आहे. विदर्भातील नागपूरसह सर्वच शहरांमध्ये पारा सरासरीपेक्षा दोन ते पाच अंशांनी घसरला. बुधवारी 12.8 अंशांवर असलेला पारा चोवीस तासांत पाच अंशांनी घसरून 8.6 अंश सेल्सिअसवर आला. कमाल तापमानातही चार अंशांची घसरण होऊन पारा 24.3 अंशांवर आला. 

गुरुवारी थंडीची तीव्रता आणखी वाढली. सकाळी आणि सायंकाळच्या सुमारासच नव्हे, दुपारीही गारठा व बोचरे वारे जाणवत होते. थंडीमुळे दिवसभर नागपूरकर हैराण होते. त्यामुळे दिवसाही स्वेटर्स घालूनच शहरात फिरावे लागले. यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच थंडीची शहरात सगळीकडेच चर्चा होती. विदर्भात गुरुवारी सर्वांत कमी तापमानाची नोंद अकोला (8.0 अंश सेल्सिअस) येथे झाली. विदर्भात थंडीचा प्रभाव आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचे संकेत हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले. 

1937 मध्ये पारा 3.9 अंशांवर 
डिसेंबरनंतर सर्वाधिक थंडीचा महिना म्हणून जानेवारीची ओळख आहे. या महिन्यात पारा सरासरी 8.4 अंशांवर असतो. मात्र, 1937 मध्ये सात जानेवारीला किमान तापमानाने 3.9 अंश सेल्सिअसचा सार्वकालिक नीचांक नोंदला होता. तर, कमाल तापमानाचा उच्चांक 35 अंश सेल्सिअस इतका आहे, जो 29 जानेवारी 1900 रोजी नोंदला गेला. याशिवाय जानेवारी महिन्यात वरुणराजाही अवकाळी "एंट्री' घेऊन बळीराजाचे टेंशन वाढवत असतो. 7 जानेवारी 1960 मध्ये चोवीस तासांत तब्बल 60.3 मिलिमीटर पाऊस बरसला होता.

 

Web Title: cold temperature in nagpur