
तालुक्यात शुक्रवारी (ता. 26) पडलेल्या कडाक्याच्या थंडीचा प्रकोप शेतातील पिकांवर झाला आहे. कपाशी आणि तुरीवर दव गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वरुड तालुक्यातील अनेक भागांत या दवाचा प्रकोप दिसून येत असल्याने उत्पन्नात घट येणार असल्याची चिंता शेतकऱ्यांना आहे.
वरुड (जि. अमरावती) : गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या शुक्रवारी परिसरात जोरदार थंडी पडली होती. या कडाक्याच्या थंडीचा परिणाम शेतातील पिकांवर झाला आहे. कपाशी व तूर या पिकांवर दव गेला आहे. दवाच्या प्रकोपाने ही दोन्ही पिके सुकल्यासारखी झाली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील राजुराबाजार, मोरांगणा, मिलानपूर, वडाळा, चिंचरगव्हाण यांसह तालुक्यातील इतर शेतशिवारात दवाचा प्रकोप दिसून येत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. आधीच सततच्या पावसामुळे कपाशीची सुरुवातीची बोंडे सडली. पाऊस जास्त झाल्याने कपाशीला या वर्षी कमी प्रमाणात बोंडे लागल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे.
पाऊस निघून गेल्यानंतर शिल्लक पात्यांची बोंडे झाली. त्याचेच उत्पादन होणार असल्याने खर्चही निघणार की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना लागून होती. अशातच आता दव गेल्याने कपाशी वाळणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. शिवाय या वर्षी तुरीचे पीक चांगले होते. त्यावर शेतकऱ्यांची भिस्त होती.
हेही वाचा की : प्रियकराने दिला दगा अन् ती लागली रडायला
दवाच्या घाल्याने शेतकरी हवालदिल
परंतु, जेमतेम शेंगा लागलेल्या तुरीवर आता दव गेल्याने तुरीच्या शेंगाही नष्ट झाल्या आहेत. तूरही काही दिवसांत वाळणार आहे तसेच दवामुळे तुरीचा बारही खचल्याने नवीन फळधारणेवरही परिणाम होणार आहे.
परिणामी कपाशीसह तुरीचे पीकही शेतकऱ्यांच्या हातातून जाणार असल्याने मोठे संकट ओढावले आहे. या पिकांना लागलेला उत्पादनखर्चही आता भरून निघणे शक्य नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दवाच्या घाल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येते.
हे वाचा : मुलासाठी नोकरी सोडली अन् झाली...
दोन्ही पिके सुकल्यासारखी झाली
माझ्याकडे मिलानपूर शेतशिवारात दहा एकर शेती आहे. त्यामध्ये कपाशी व तुरीचे पीक आहे. या दोन्ही पिकांवर दव गेला आहे. पिकांवर दोन-अडीच लाखांचा उत्पादनखर्चही झाला आहे. मात्र, आता तूर आणि कपाशीवर दव गेल्याने दोन्ही पिके सुकल्यासारखी झाली आहेत. त्यामुळे शासनाने मदत देण्याची गरज आहे.
- आसिफ खान सरदार खान, शेतकरी.
आदेशानंतर पुढील कार्यवाही
तालुक्यात पिकांवर दव गेल्याची माहिती मिळाल्यानंतर कृषी सहायकांना प्राथमिक पाहणीच्या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. प्राथमिक अहवाल प्राप्त होणार आहे. नदी-नाल्याच्या काठांवरील शेतांमध्ये दवाचा प्रकोप इतर ठिकाणांपेक्षा जास्त दिसून येत आहे. आदेशानंतर पुढील कार्यवाही करू.
- उज्ज्वल आगरकर, तालुका कृषी अधिकारी.