प्रसिद्धी पिपासू जिल्हाधिकाऱ्यांचा उद्दामपणा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

अकोला : शहरात नुकत्याच पार पडलेल्या मोर्णा महोत्सवाला भरभरून प्रसिद्धी का दिली नाही, असा सवाल करीत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी (ता. 31) संपादक व पत्रकारांना चहापानासाठी बंगल्यावर बोलवून संताप व्यक्त केला. त्यासाठी त्यांनी पत्रकारांना चक्क दूषित पाण्याचे प्याले दिले. सोबतच धूर करून संपादक, पत्रकारांचे स्वागत करण्याचा बालिशपणाही केला.

अकोला : शहरात नुकत्याच पार पडलेल्या मोर्णा महोत्सवाला भरभरून प्रसिद्धी का दिली नाही, असा सवाल करीत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी (ता. 31) संपादक व पत्रकारांना चहापानासाठी बंगल्यावर बोलवून संताप व्यक्त केला. त्यासाठी त्यांनी पत्रकारांना चक्क दूषित पाण्याचे प्याले दिले. सोबतच धूर करून संपादक, पत्रकारांचे स्वागत करण्याचा बालिशपणाही केला.

अकोल्याचे वैभव असलेल्या मोर्णा नदीच्या स्वच्छतेला वर्तमानपत्रांनी भरभरून प्रसिद्धी दिली. पुढे त्याची दखल थेट पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यानंतर अलिकडेच शहरात मोर्णा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या सर्वच सांस्कृतिक कार्यक्रमांना यथोचित प्रसिद्धी दिल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांना ती पुरेसी वाटली नाही. त्यामुळे वृत्तपत्रांना जाब विचारण्याच्या हेतूने जिल्हाधिकाऱ्यांनी संपादक व पत्रकारांची चहापानासाठी बैठक बोलावली. सुरुवातीला नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे चहापान असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार संपादक व काही पत्रकार जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी पोहोचले. तेथे मोर्णा महोत्सव आयोजन समितीचे डॉ. गजानन नारे, प्रा. मधु जाधव, अशोक ढेरे तसेच अन्य एकदोघे आणि उपजिल्हाधिकारी संजय खडसे हे उपस्थित होते. 

जिल्हाधिकाऱ्यांनी लगेच दूषित पाण्याने भरेलले प्याले बोलावले ते संपादक व पत्रकारांच्या हाती दिले, जादू बघा, असे ते म्हणाले. उत्सुकतेने पत्रकार हे सर्व बघत होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एका कर्मचाऱ्याला जादू आणण्यास सांगितले. त्या कर्मचाऱ्यांने कचऱ्याचा जाळ पेटविलेले एक टोपले आणले ते संपादकांसमोर ठेवण्यात आले. त्यातून धूर निघत होता. हे काय सुरू आहे, असा सवाल संपादक व पत्रकारांनी केल्यानंतर थोडा धीर धरा, असे सांगून त्यांनी उत्सुकता ताणून धरली. त्यानंतर उपस्थित संपादक व पत्रकारांना ज्ञान पाजण्याच्या मोठ्या आविर्भावात बोलणे सुरू केले. त्यांनी वृत्तपत्रांचा गठ्ठा बोलावला. त्यातून एकेका वृत्तपत्राचे चार दिवसांचे अंक बाहेर काढले. त्यातील मोर्णा महोत्सवाला देण्यात आलेल्या प्रसिद्धीवर त्यांनी कॉमेन्ट करणे सुरू केले. मोर्णा महोत्सव आयोजन समितीतील प्रमुख मंडळींना उभे करून या व्यक्तींशी तुमची काय दुश्मनी आहे, त्यांनी काय तुमचे बिघडविले, असे ते म्हणाले. यावर मोर्णा महोत्सव आयोजन समितीचे सर्व जण चुपचाप होते. संपादक व पत्रकारांनी संयमाने ऐकून घेण्याची भूमिका कायम ठेवली. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांचे बोलणे वाढतच होते.

लेखणी चांगल्यासाठीच वापरा, पगार मिळतो, नोकऱ्यांशी इमान राखा. त्या कधीही जाऊ शकतात, असे ते म्हणाले. यावर सर्वच संपादक व पत्रकार खवळले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. कोणत्या बातमीला प्रसिद्धी द्यायची याचे अधिकार संपादकांकडे असतात, ते कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे उपस्थित संपादक व पत्रकारांनी एका सुरात जिल्हाधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. सर्व संपादक, पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर मला कुणाचा अपमान करायचा नव्हता, असे सांगत त्यांनी क्षमायाचना सुरू केली. त्यानंतर सर्वच पत्रकारांनी निषेध करीत बहिर्गमन केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी फेकले वृत्तपत्र
मोर्णा महोत्सवाला एका स्थानिक वृत्तपत्राने मुळीच प्रसिद्धी दिली नाही. त्या वृत्तपत्राने मोर्णा महोत्सवावर बहिष्कार घातला का, असा सवाल करीत हे अंक म्हणजे चार दिवसांची रद्दीच होय, अशी उद्दाम भाषा वापरत ते त्यांनी चक्क फेकले.  

आयोजन सरकारी की खासगी?
मोर्णा महोत्सवाचे आयोजन खासगी होते की, सरकारी, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. मोर्णा महोत्सवाचे आयोजन हे खासगी संस्थेमार्फेत होते तर त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी एवढा रस घेण्याची गरज काय? या महोत्सवाच्या प्रत्येक आयोजनापासून ते थेट प्रसिद्धीपर्यंतची काळजी वाहणे म्हणजे हे सरकारी प्रोयोजित आयोजन होते का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. कलेक्टरांच्या या बालिशपणामुळे मोर्णा आयोजन समिती सदस्यांचीही पंचाईत झाली.

‘सकाळ’च्या मोर्णा संवर्धन मोहिमेचाही विसर
अकोला शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोर्णा नदीचे महत्त्व ओळखून ‘सकाळ’ माध्यम समुहाने अकोल्यात सर्वप्रथम मोर्णा संवर्धन मोहीम राबविली. मोर्णा नदी काठचे जीवन, त्याचे ऐतिहासिक, पर्यावरणदृष्ट्या महत्त्व ‘सकाळ’ने पटवून दिले. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, तत्कालीन महापौर, आयुक्त यांच्या उपस्थित मोर्णा संवर्धन मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. महापालिकेच्या सहकार्यातून ही मोहीम राबविण्यात आली होती. त्याला शहरातील अनेक संघटनांनी पाठिंबा दिला. या मोहिमेत मोर्णा नदीतील संपूर्ण जलकुंभी काढण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत नदीच्या काठावर ठिकठिकाणी जनजागृती कार्यक्रमही घेण्यात आले होते. त्यानंतर अकोल्यात नव्याने रूजू झालेल्या जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दुसऱ्यावर्षी या मोहिमेला चालना दिली. पुढे त्याचे रूपांतर जनमोहिमेत झाले. मात्र, स्वतःची आरती ओवाळण्यात मश्गुल असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना दूसऱ्याने केलेल्या चांगल्या कामांचेही भान नसल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

माफीही मागितली
जिल्हाधिकाऱ्यांच्या उद्दामपणाला संपादक, पत्रकारांनी एका सुरात चोख प्रत्युत्तर देत बहिर्गमन केल्याने हादरलेल्या जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी साेमवारी (ता. ३१) रात्री ‘सकाळ’ कार्यालयात येऊन व्यक्तिशः माफीही मागितली. माझा कुणालाही दुखविण्याचा हेतू नव्हता. माझ्या वागण्या, बोलण्यातून कुणाचे मन दुखविले गेले असेल तर मी माफी मागतो, असे ते म्हणाले.

दूषित पाणी पिल्याने मळमळ
जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चेसाठी बोलावलेल्या संपादक, पत्रकारांना दिलेले दूषित पाणी एका पत्रकाराने पिले. त्‍यामुळे त्याला मळमळ झाली. ग्लासमधील पाणी शरबत नसून दूषित पाणी आहे. हे न सांगुन पत्रकारांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकारही जिल्हाधिकाऱ्यांनी केला.

Web Title: collector Astik kumar misbehave with journalist in akola