जिल्हाधिकार्‍यांनी केली कपाशीवर फवारणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

यवतमाळ : गेल्या वर्षी पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना जिल्ह्यातील 22 शेतकरी व शेतमजुरांचा विषबाधेने मृत्यू झाला होता. यंदा त्याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुढाकार घेतला असून गुरुवारी (ता. 2) तालुक्यातील भिसनी येथील सुरेश पाडसेकर यांच्या शेतात कपाशीवर स्वतः सुरक्षाकिट घालून फवारणी केली.

मागील वर्षी खरीप हंगामात कपाशीवर गुलाबी बोंडअळीसह विविध अळींचे आक्रमण झाले होते. पीके वाचविण्यासाठी शेतकर्‍यांनी फवारणी केली. परंतु, विषबाधा झाल्याने 22 शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला. सातशेच्या वर शेतकरी बाधीत झाले. यंदा फवारणीदरम्यान विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी सुरक्षाकिट घालून फवारणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी गुरुवार (ता. 2) पासून तर चार ऑगस्टदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात करताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्वत: सुरक्षाकिट घालून फवारणी केली. कृषी व महसूल विभागाचे अधिकारी या मोहीमेदरम्यान प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणार आहे.

बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी फेरोमन ट्रॅपचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकार्‍यांना करून दाखविले. आरोग्य विभागाच्या माध्यमातून फवारणी करणार्‍या शेतकरी शेतमजुरांची तपासणी करण्याचे आदेश डॉ. देशमुख यांनी दिले आहेत. 

पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकरी व शेतमजुरांनी आपल्या जिवाची आधी काळजी घ्यावी. फवारणी करताना सुरक्षाकिट घालूनच फवारणी करावी. 
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी यवतमाळ.

Web Title: collector sprays pesticides on crops