चार 'टॉप कलेक्‍टर'ची बदली केव्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

आगामी अधिवेशनाचे काम पाहता काही कर्मचारी गुन्हे शाखेत कायम ठेवण्यात आले आहेत. त्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेतली आहे. कर्मचाऱ्यांचे काम संपताच त्यांना बदली झालेल्या ठिकाणी सोडल्या जाईल.
-संभाजी कदम, पोलिस उपायुक्‍त, गुन्हे शाखा.

नागपूर : सात ते आठ महिन्यांपूर्वीच बदली झालेल्या काही पोलिस कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेचा मोह सुटत नाही. बदली झाल्यानंतरही वरिष्ठांच्या आशिर्वादामुळे गुन्हे शाखेला चिटकून असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी चार "टॉप डाटा कलेक्‍टर'ची पोलिस वर्तुळात चांगली चर्चा होत आहे.

पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेश्‌म यांनी पारदर्शक आणि सकारात्मक पोलिस दलाची कमान सांभाळली आहे. मात्र, काही अधिकारी पोलिस आयुक्‍तांच्या आदेशाची पायमल्ली करीत आहेत. सात महिन्यांपूर्वी पोलिस विभागाअंतर्गत पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. मात्र, तपासाच्या नावाखाली काही पोलिस कर्मचारी गुन्हे शाखेत आजही कायम आहेत. त्यामुळे ज्यांना गुन्हे शाखेतून बदलीच्या नावाखाली रवानगी केली तसेच गुन्हे शाखेत नव्याने आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये मतदभेद निर्माण झाले आहेत. चारही कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेचे "टॉप कलेक्‍टर' म्हणून ओळखल्या जातात. त्यांची "ठाकूरकी' सुरू असून नवीन आलेल्या कर्मचाऱ्यांवर "दादागिरी' करीत असल्याची माहिती आहे. गुन्हे शाखेतून बदली झाल्यानंतर ते कर्मचारी गुंडांची माहिती काढणे, अटक, मोठमोठे छापे किंवा मोठा तपास पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. अशी कामगिरी करून वरिष्ठांची मर्जी संपादन
करतात. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेत काही महिन्यांसाठी बढती दिल्या जाते. सध्या गुन्हे शाखेला चिकटलेल्या चौघांपैकी दोघे जण कारने तर दोघे जण महागड्या बाईकने येतात. उर्वरित तपास पूर्ण करण्याच्या नावाखाली त्या कर्मचाऱ्यांना "एक्‍सटेंशन' दिल्या जात आहे. मात्र, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या भेदभावामुळे पोलिस वर्तुळात नाराजीचा सूर निघत आहे.

आगामी अधिवेशनाचे काम पाहता काही कर्मचारी गुन्हे शाखेत कायम ठेवण्यात आले आहेत. त्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेतली आहे. कर्मचाऱ्यांचे काम संपताच त्यांना बदली झालेल्या ठिकाणी सोडल्या जाईल.
-संभाजी कदम, पोलिस उपायुक्‍त, गुन्हे शाखा.

Web Title: collector transfer in Nagpur