महाविद्यालयांतील कॅंटीनची होणार तपासणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर ः शाळा व महाविद्यालयांच्या कॅंटीनमध्ये पिझ्झा, बर्गरसारखे जंक फूड दिले जात आहे का? याची तपासणी अन्न व औषधी प्रशासन विभागाची पाच सदस्यांची समिती करणार आहे. "शाळा व महाविद्यालयांच्या कॅंटीनमधून पिझ्झा, बर्गर यासारखे जंक फूड हद्दपार करून पारंपरिक खाद्यपदार्थ, फळे, कडधान्यासारखे पोषक अन्नघटक असणारे पदार्थ द्यावेत,' अशा सूचना अन्न व औषधी प्रशासन विभागाने दिल्या होत्या. विभागातील 256 शाळा व महाविद्यालयांच्या कॅंटीनमध्ये तपासणी मोहीम सप्टेंबर महिन्यात राबविण्यात येणार आहे.
वडापाव, बर्गर, पिझ्झा, मॅगी आणि नुडल्स हे महाविद्यालय व शाळांमधील कॅंटीनमधील हक्काचे मेनू आता हद्दपार करण्यात येणार आहेत. या जंक फूडमधील अतिरिक्त मेद, साखर आणि मीठ मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे समोर आले आहे. या पदार्थांच्या सेवनाने मुलांमध्ये स्थूलपणा वाढतो; तसेच मधुमेहासारखे आजार बळावण्याची शक्‍यता निर्माण होते. अगदी कमी वयातही मधुमेह, हृदयविकार होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असणाऱ्या पदार्थांचे सेवन कमी करण्याच्या उद्देशाने विभागाने जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
शाळा व महाविद्यालयांच्या कॅंटीनमध्ये या पदार्थांऐवजी पौष्टिक अन्नपदार्थ ठेवण्याचे आवाहन शाळा, महाविद्यालयांना करण्यात आले आहे. यासाठी विभागाने कॅंटीनसाठी मार्गदर्शिका तयार केली आहे. नागपूर कार्यालयाने कार्यवाहीस सुरुवात केली आहे. त्यानुसार विभागातील कॅंटीनची सोय असलेल्या 256 शाळा आणि महाविद्यालयांना पत्र पाठविले. आता सप्टेंबर महिन्यापासून त्या सर्वच कॅंटीनची तपासणी करण्यात येणार आहे. "एफडीए'च्या अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी शाळा महाविद्यालयांना भेटी देऊन प्राचार्य, मुख्याध्यापकांना आहार मेनूत काय बदल करणे अपेक्षित आहे, याबाबत सूचना देणार आहेत. ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर या दरम्यान विद्यार्थी व पालकांसाठी कार्यशाळा आहे. नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये प्रशासनाकडून आढावा घेण्यात येणार आहे.

हेल्दी फूडचा आग्रह
नागपूर शहरात 68 तर विभागात 188 शाळा व महाविद्यालयांमध्ये कॅंटीन असल्याने त्यांना "हेल्दी फूड' देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्याची तपासणी सप्टेंबर महिन्यात सुरू करणार आहे. त्यासाठी पाच सदस्यांची समिती तयार केली आहे. त्यात मुख्याध्यापक, प्राचार्य, आहारतज्ज्ञ, एफडीएचा प्रतिनिधी, कॅंटीन चालकाचा समावेश आहे.
- शशिकांत केंकरे, सहआयुक्त अन्न व औषधी प्रशासन विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com