file photo
file photo

15 वर्षांनंतर प्रथमच "टक्कर'

यवतमाळ : दिग्रस विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. विशेष म्हणजे या मतदारसंघाचे अनेक 'अपक्ष' उमेदवारांनीदेखील प्रतिनिधित्व केले आहे. 2004च्या निवडणुकीपासून या मतदारसंघावर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. परंतु, यावेळी 15 वर्षांनंतर पहिल्यांदाच 'टक्कर' होताना दिसत आहे. सेनेच्या उमेदवारासमोर भाजप बंडखोराने आव्हान उभे केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने येथे उमेदवार दिला असला तरी लढत मात्र सेना व भाजप बंडखोरातच असल्याची चर्चा या मतदारसंघाचा मागोवा घेतला असता ऐकू येत आहे.
पूर्वीचा दारव्हा विधानसभा मतदारसंघ 2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेत दिग्रस विधानसभा मतदारसंघ झाला आहे. या मतदारसंघात दारव्हा, दिग्रस व नेर या तीन तालुक्‍यांच्या समावेश झाला आहे. पूर्वीचा दारव्हा व आजच्या दिग्रस मतदारसंघात अनेक बदल झाले आहे. त्यात सामाजिक समीकरणेही बदलली आहेत. कधीकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाची ओळख होती. कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सलग चार वेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केले. तर, शिवसेनेचे संजय राठोड यावेळी आपली चौथी टर्म पूर्ण करण्याच्या बेतात आहेत. कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ आता शिवसेनेचा गड बनला आहे. यावेळी शिवसेनेचे राज्यमंत्री व विद्यमान आमदार संजय राठोड व भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार, माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांच्यातच सरळ लढत होताना दिसत आहे. यावेळी एजाज नवाज खान (बहुजन समाज पक्ष), तारिक साहिर लोखंडवाला (राष्ट्रवादी कॉंग्रेस), देवराव म्हासाळ (बळीराजा पार्टी), बिमोद विठ्ठल मुधाणे (बहुजन मुक्ती पार्टी), ऍड. शहेजाद खान (वंचित बहुजन आघाडी) आदींसह आशीष देशमुख, नंदू ठाकरे व भीमराव पाटील हे तिघे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. हा मतदारसंघ बंजाराबहुल असून मराठा, कुणबी समाजही येथे मोठ्या प्रमाणात आहे. मुस्लिम आणि बौद्ध समाजाची मतेही निर्णायक आहेत. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने तारिक साहिर लोखंडवाला यांना उमेदवारी दिली असली तरी ते त्याठिकाणी नवखे आहेत. त्यामुळे त्यांना शर्यतीत येण्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागत आहे. तर, माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांनी एक वर्षापूर्वी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारीसाठी प्रयत्न केले आहे. परंतु, हा मतदारसंघ युतीत शिवसेनेला सुटल्याने त्यांचा दावा खारीज झाला. पक्षाने त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून मुख्यमंत्र्यांनीच आपल्याला उमेदवारी दिल्याचा प्रचार करीत भास निर्माण केला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या दिग्रसमधील मैदानावर संजय देशमुख यांना भाजपत प्रवेश दिला होता, त्याच मैदानावर त्यांची पक्षातून हकालपट्टीही केल्याचे जाहीर केले. त्यामुळे देशमुख यांच्यासोबत असलेला पोळा अचानक फुटला. आता, त्यांना तिन्ही तालुक्‍यांत आपले समर्थक घेऊन मतांसाठी प्रयत्न करावे लागत आहे. मात्र, याउलट सेनेच्या उमेदवारांची स्थिती आहे. ते आपले मताधिक्‍य टिकविण्यासाठी नव्हे तर वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. मात्र, नवीन निर्माण होणारी समीकरणे परिवर्तनाची भाषा बोलत आहे. सेनेच्या उमेदवारासमोर भाजप बंडखोराने आव्हान उभे केल्याचे चित्र दिसून येत आहे. जातीय समीकरणे कुणासाठी फायद्याचे तर कुणासाठी नुकसानदायक होताना दिसत आहे. 

मताधिक्‍यांचा वाढता आलेख
2004 च्या निवडणुकीत संजय राठोड यांना 68 हजार 586 मते मिळाली होती. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी माणिकराव ठाकरे यांना 47,044 मते मिळालीत. 2009 मध्ये संजय राठोड यांना एक लाख चार हजार 134 मते पडली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी संजय देशमुख यांना 49 हजार 989 मते मिळाली. 2014 मध्ये संजय राठोड यांना एक लाख 21 हजार 216 मते मिळाली तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वसंतराव घुईखेडकर यांना 41,352 मते पडली. या तिन्ही निवडणुकांचा विचार करताना संजय राठोड यांचे मताधिक्‍य वाढतच आहे. अनुक्रमे 21 हजार 542, 54 हजार 145 व 79 हजार 864 असा त्यांच्या विजयी मतांचा वाढता आलेख आहे. 

वर्षे आमदार पक्ष
(दारव्हा विधानसभा मतदारसंघ)
1962 : अली हसन ममदानी (कॉंग्रेस)
1967 : व्ही. बी. घुईखेडकर (अपक्ष)
1972 : अली हसन ममदानी (कॉंग्रेस)
1978 : हरिनारायण मानधणा (अपक्ष)
1980 : ऍड. हरीश मानधणा (कॉंग्रेस आय)
1985 : माणिकराव ठाकरे (कॉंग्रेस)
1990 : माणिकराव ठाकरे (कॉंग्रेस)
1995 : माणिकराव ठाकरे (कॉंग्रेस)
1999 : माणिकराव ठाकरे (कॉंग्रेस)
2004 : संजय राठोड (शिवसेना)
(दिग्रस विधानसभा मतदारसंघ)
2009 : संजय राठोड (शिवसेना)
2014 : संजय राठोड (शिवसेना) 


 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com