निधी स्थगितीविरोधात मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

हिंगणा ः विकास निधी स्थगितीविरोधात मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करताना भाजप कार्यकर्ते.
हिंगणा ः विकास निधी स्थगितीविरोधात मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करताना भाजप कार्यकर्ते.

हिंगणा (जि.नागपूर) : तत्कालीन भाजप सरकारच्या काळात सुरू असलेल्या विकासकामांना महाविकास आघाडीने स्थगिती दिली. सरकारच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर सोमवारी (ता. 9) मोर्चा काढण्यात आला. सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. हिंगण्यातील शिवाजी पुतळयासमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यामुळे पोलिस विभागाचीही ऐनवेळी तारांबळ उडाली.

विकासकामांना खिळ
रायपूर येथील बौद्ध हक्क परिषदेच्या परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात मोर्चा तहसील कार्यालयाकडे निघाला. तत्कालीन भाजप सरकारच्या काळात हिंगणा विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली. पर्यटन, सिंचन, कृषी, रस्ते, पाणीपुरवठा, नागरीसुविधांसह इतर योजनांवर कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यातील काही विकासकामे पूर्ण झाली असून, काही विकासकामांसाठी दुसऱ्या टप्प्याचा निधी मिळालेला नाही. नवे महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर ही विकासकामे पूर्ण होतील, अशी आशा होती. मात्र, सरकारने विकासकामाला स्थगिती दिल्याने जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे. हा रोष सरकारला दाखवण्यासाठी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

पंचायत समिती कार्यालयासमोर हिंगणा पोलिस ठाण्यामार्गे मोर्चा शिवाजी चौक हिंगणा येथे पोहोचला. आमदार शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेले असता कार्यकर्त्यांनी चौकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन केले. अचानक पुतळ्याचे दहन झाल्याने पोलिसांची भंबेरी उडाली. अर्धवट जळालेल्या अवस्थेतील पुतळ्याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले. या वेळी मोर्चासोबत सहायक पोलिस उपायुक्त सिद्धार्थ शिंदे, ठाणेदार सारीन दुर्गे व इतर पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पुतळा जाळल्याप्रकरणी गुन्हे दाखल
महाविकास सरकारच्या विरोधात भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान शिवाजी चौकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. या प्रकरणी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती सहायक पोलिस उपायुक्त सिद्धार्थ शिंदे व ठाणेदार सारिन दुर्गे यांनी दिली. आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राज्यातील पहिली घटना
महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ होताच विकासकामांना स्थगिती दिली. यामुळे महायुतीत एकत्र असणाऱ्या भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. यामुळे 25 वर्षांची मैत्री असलेल्या मोठ्या भावाने लहान भावाचा पुतळा जाळल्याची प्रतिक्रिया जनतेमध्ये उमटली. मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याची राज्यातील पहिली घटना म्हणून या घटनेची नोंद झाली, हे विशेष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com