पाहुणा म्हणून आला अन्‌... 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

- धंतोलीतील घटना 
- घरात दोघांचीही चोरून लपून भेटी-गाठी 
- नाश्‍ताच्या बहाण्याने नेले बाहेर 

नागपूर : मामाच्या घरी पाहुणा म्हणून आलेल्या युवकाने मामाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले. फिरायला गेलेले दोघेही घरी परत न आल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. धंतोली पोलिस ठाण्यात पाहुण्या युवकावर मामेबहिणीला पळवून नेल्याचा गुन्हा झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 वर्षीय मुलीचे वडील प्रॉपर्टी डिलर आहे. त्यांचे धंतोलीतील घरी कार्यालयसुद्धा आहे. त्यांची मोठी बहीण उत्तरप्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील लखाटा शहरात राहते. तिचा मुलगा गुड्डू लालप्रताप सिंग (26) हा दिवाळीला पाहुणा म्हणून नागपुरात राहणाऱ्या मामाकडे आला. मामाच्या 14 वर्षीय मुलीला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढळे. काही महिन्यांपासून दोघेही फोनवरून एकमेकांच्या संपर्कात होते. 

मामेभाऊ असल्यामुळे मुलगी फोनवर बोलत असताना कुणीही तिच्यावर संशय घेतला नाही. या दरम्यान दोघांचेही संबंध वाढले. रिकामटेकडा असलेल्या गुड्डूने नागपूरला येत असल्याचे मुलीला सांगितले. दिवाळीपूर्वी तो मामाकडे आला. काही दिवस राहिल्यानंतर त्याने अल्पवयीन असलेल्या मामेबहिणीला प्रेम जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवले. मात्र, वय आणि मामाची संपत्ती आडवी येणार अशी कल्पना असल्यामुळे त्याने मामेबहिणीला पळून जाण्याचा सल्ला दिला. 

घरातील वातावरणाचा दोघांनीही अंदाज घेतला. घरात दोघांचीही चोरून लपून भेटी-गाठी होत होत्या. मात्र, गुड्डूने संशय येऊ नये म्हणून काळजी घेतली. दोघांचाही शुक्रवारी पळून जाण्याचा प्लान तयार झाला. मुलीने बॅगेत कपडे भरले आणि ती बॅग मैत्रिणीच्या घरी नेऊन ठेवली. काही पैसेही पदरी घेतली. गुड्डूने शुक्रवारी दुपारी तीन वाजता नाश्‍ता करायला बाहेर नेत असल्याचे मामीला सांगितले. दोघेही नाश्‍त्याच्या बहाण्याचे बाहेर पडले. रात्री नऊ वाजले तर दोघेही घरी परतले नाही. 

कुठेतरी गेले असावे म्हणून वाट बघितले. मात्र, दोघेही सोबत पळून गेल्याची कुणकूण लागताच मामाने धंतोली पोलिस ठाण्यात भाच्याविरुद्ध पळवून नेल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून पाहुणा म्हणून आलेल्या भाच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. काही दिवसांतच धंतोली पोलिसांचे पथक उत्तरप्रदेशाला जाणार आहे, अशी माहिती धंतोलीचे ठाणेदार विजय आकोत यांनी दिली. 

Image may contain: 1 person, suit

पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे
कुमार वयातील मुलां-मुलींमध्ये शारीरिक आकर्षण निर्माण होते. शारीरिक बदल घडून येतात. मानसिक प्रगल्भता आलेली नसल्याने मुलींना थोडे प्रेम, आपुलकी दाखविल्यास फसतात. त्यामुळे पालकांनी त्यांच्याशी वागताना विशेष भान ठेवणे गरजेचे आहे. 14 ते 17 वयोगटातील मुलींच्या वागण्यातील बदल आणि शारीरिक बदल यांच्याकडे आईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा अशा घटना घडतात. पालकांनी जागरूक राहणे आवश्‍यक आहे. मुलींच्या मोबाईलमध्ये काय आहे? कुणाशी जास्तवेळ बोलते? मुलीच्या नावाने कुण्या बॉयफ्रेंडचा नंबर सेव्ह आहे का? अशा गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. 
- प्रा. राजा आकाश (मानसोपचारतज्ञ) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Come as a guest and ...