महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंग यांचे ‘पॅक-अप’!

Commissioner-Virendra-Singh
Commissioner-Virendra-Singh

नागपूर - महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंग यांचे नागपूर महापालिकेतून ‘पॅक-अप’ झाले सूत्राने नमूद केले आहे. वीरेंद्र सिंग यांनी महापालिकेत काम करण्याची असमर्थता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केल्याची पुस्तीही सूत्राने जोडली. 

गेल्या दीड महिन्यानंतर आयुक्त वीरेंद्र सिंग शनिवारी नागपुरात आले. रविवारी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकमातही दिसले. सोमवारी ते महापालिकेत रुजू होतील, अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांना मुंबईत बोलावल्याने ते सोमवारी सकाळी सात वाजता मुंबईकडे रवाना झाले. आज ते रुजू होतील, अशी चर्चा होती. मात्र, आता ते महापालिकेत रुजू होणार नसल्याचे उच्चपदस्थ सूत्राने सांगितले. वीरेंद्र सिंग यांनी विकासकामांत कपात केल्यावरून सत्ताधारी व त्यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले होते. शिस्तप्रिय सिंग यांनी पालिकेला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा हा प्रयत्न अंगलट आल्याची चर्चा आता मनपा वर्तुळात आहे. त्यांनी ४ मे रोजी महापालिकेचा पदभार स्वीकारला होता. ३ सप्टेंबरपासून ते रजेवर गेले होते. दीड महिन्यानंतर ते शनिवारी नागपुरात आले होते. दरम्यान, सध्या अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची मनपाचे आयुक्त म्हणून नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे. बांगर हे उस्मानाबाद जिल्ह्यातीस कळंब येथील असून २००८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी रायगड, सातारा, पालघर जिल्ह्यात आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.

अभिजित बांगर आयुक्त? 
मुंबईत वीरेंद्र सिंग यांनी मुख्यमंत्र्यांकडे नागपुरात काम करण्यास असमर्थ असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनीही त्यांची विनंती मान्य केल्याचे समजते. त्यामुळे आयुक्त सिंग आता महापालिकेत रुजू होण्याऐवजी पदभार सोपविण्यासाठीच येतील. अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या  नावावर पालिकेचे आयुक्त म्हणून शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचेही सूत्राने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com