आयुक्तांची थेट स्वच्छतागृहात धडक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

काम करा नाही, तर बाजूला व्हा
नागपूर - स्वच्छतेसाठी आग्रही असलेल्या महापालिका आयुक्त अश्‍विन मुद्‌गल यांनी मंगळवारी थेट स्वच्छतागृहात शिरून पाहणी केली. अनेक ठिकाणी घाण आढळून आल्यानंतर त्यांनी काम करा नाही, तर पद रिक्त करा, असा इशारा दिल्याने महापालिकेचे अधिकारी चांगलेच धास्तावले.

काम करा नाही, तर बाजूला व्हा
नागपूर - स्वच्छतेसाठी आग्रही असलेल्या महापालिका आयुक्त अश्‍विन मुद्‌गल यांनी मंगळवारी थेट स्वच्छतागृहात शिरून पाहणी केली. अनेक ठिकाणी घाण आढळून आल्यानंतर त्यांनी काम करा नाही, तर पद रिक्त करा, असा इशारा दिल्याने महापालिकेचे अधिकारी चांगलेच धास्तावले.

धरमपेठ झोनअंतर्गत येणाऱ्या कोलपुरा खदान आणि मंगळवारी झोनअंतर्गत येणाऱ्या भीमनगर येथील हागणदारी परिसराची त्यांनी पाहणी केली. अनेक महिन्यांपासून सूचना देऊनही शौचालयाची स्वच्छता केली नसल्याने स्वच्छता निरीक्षक नितनवरे यांना त्यांनी खडेबोल सुनावले. काम करायचे नसल्यास तसे स्पष्ट सांगा, काय करायचे ते आम्ही बघू, अशा शब्दात त्यांना तंबी दिली.

कोलपुरा खदान येथील नागरिकांना देण्यात आलेल्या बायोडायजेस्टर शौचालयाचा वापर करण्यात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. येथील एका शौचालयाची स्थिती वापरण्यासारखी नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. एक सार्वजनिक शौचालय आणि परिसरातील तीन कुटुंबीयांच्या अर्जातील त्रुटींची पूर्तता करून त्यांना त्वरित शौचालय देण्यात यावे, असे आदेश दिले. त्यानंतर आयुक्तांनी भीमनगर परिसराची पाहणी केली. नागरिकांना देण्यात आलेले बायोडायजेस्टर शौचालय वापरण्यात अडचण आहे का, याबद्दल नागरिकांची विचारपूस केली. परिसर स्वच्छतेबद्दलही पाहणी केली. या दौऱ्यात आयुक्तांनी कनक रिर्सोसेसच्या कचरा संकलन वाहनाची आकस्मिक पाहणी केली.

कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. या वेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे, मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत, उपअभियंता गिरीश वासनिक होते.

Web Title: commissioner visit to toilet