खड्ड्यानंतर आयुक्तांची प्लॅस्टिकबंदीवर नजर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

नागपूर : शहरातील खड्ड्यांबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरून ते बुजविण्याची कार्यवाही सुरू केल्यानंतर आयुक्तांनी गुरुवारी शहरात प्लॅस्टिकबंदीवर नजर केंद्रित केली. नवरात्र व गरबा उत्सवाचा प्लॅस्टिकबंदीच्या जनजागृतीसाठी वापर करण्यात येणार आहे. तसेच दोन ऑक्‍टोबरला महात्मा गांधी जयंतीनिमित्त शहरात "प्लॉग रन'च्या आयोजनाची तयारीही महापालिका करीत आहे. 

नागपूर : शहरातील खड्ड्यांबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरून ते बुजविण्याची कार्यवाही सुरू केल्यानंतर आयुक्तांनी गुरुवारी शहरात प्लॅस्टिकबंदीवर नजर केंद्रित केली. नवरात्र व गरबा उत्सवाचा प्लॅस्टिकबंदीच्या जनजागृतीसाठी वापर करण्यात येणार आहे. तसेच दोन ऑक्‍टोबरला महात्मा गांधी जयंतीनिमित्त शहरात "प्लॉग रन'च्या आयोजनाची तयारीही महापालिका करीत आहे. 
नवरात्र आणि त्यानिमित्त शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर करण्यात येणारे गरब्याचे आयोजन लक्षात घेता एकत्रित होणाऱ्या नागरिकांना महापालिका प्लॅस्टिकबंदीचा संदेश देणार आहे. प्लॅस्टिकबंदीबाबत जनजागृती करीत नागरिकांनी यासाठी स्वत: पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. स्वच्छ भारत अभियानासंदर्भात सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. 
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या स्वच्छता सप्ताहाअंतर्गत झोनस्तरावर जनजागृती रॅलीचे आयोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. विविध शहरांमध्ये प्लॅस्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी दोन ऑक्‍टोबरला "प्लॉग रन'चे आयोजन करण्याचे प्रस्तावित असल्याचे नमूद करीत त्यांनी अधिकाऱ्यांना आयोजनाचे संकेत दिले. महापालिका परिसराला सिंगल युज प्लॅस्टिकमुक्त करण्याचे निर्देश देत अन्य सरकारी कार्यालयांनाही सिंगल युज प्लॅस्टिकचा उपयोग बंद करून अभियानात सहभागी होण्याचे आवाहन आयुक्तांनी केले. 
प्लॅस्टिकऐवजी पर्यायी व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याची सूचवीत आयुक्त अभिजित बांगर म्हणाले, प्लॅस्टिकला पर्याय असलेल्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी महिला बचतगटांना प्रोत्साहित करायला हवे. या बचतगटांना शॉपिंग कॉम्प्लेक्‍स आणि मॉलशी जोडले जाईल, जेणेकरून उत्पादनाची विक्री होईल आणि प्लॅस्टिकचा उपयोग बंद करणे शक्‍य होईल. अशा उत्पादनांचे एक प्रदर्शन आयोजित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बैठकीला सर्व सहायक आयुक्त तथा स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commissioners look at plastic ban after pits