सार्वजनिक विहिरी झाल्या कचऱ्याचे आगार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

वाडी (डिफेन्स) - ग्रामपंचायत काळातील बनलेल्या सार्वजनिक विहिरी कचऱ्याने तुडुंब भरल्या असून सार्वजानिक विहिरी कचऱ्याचे माहेरघर बनल्या आहेत. या गंभीर समस्येकडे नगर परिषदचे दुर्लक्ष असून उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. 

वाडी (डिफेन्स) - ग्रामपंचायत काळातील बनलेल्या सार्वजनिक विहिरी कचऱ्याने तुडुंब भरल्या असून सार्वजानिक विहिरी कचऱ्याचे माहेरघर बनल्या आहेत. या गंभीर समस्येकडे नगर परिषदचे दुर्लक्ष असून उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. 

सध्याच्या परिस्थितीत उन्हाळ्याचे चटके लागायला सुरुवात झालेली आहे. पाण्याची समस्या काही प्रमाणात जाणवत आहे. काही विहिरी चांगल्या स्थितीत आहेत. त्या विहिरींकडे लक्ष दिल्यास तेथील नागरिकांना काही प्रमाणात पाण्याची झळ पोहोचणार नाही. ज्या विहिरीत अगोदर कचरा आहे, त्या विहिरीत नागरिक पुन्हा कचरा टाकतात. त्यासाठी विहिरींची सफाई केल्यास नागरिकसुद्धा पुन्हा कचरा टाकणार नाहीत. तुडुंब कचऱ्याने भरलेल्या विहिरींकडे नगर परिषदेने लक्ष दिले नाही तर त्या विहिरींचे रूपांतर कचऱ्याच्या कुडेदानमध्ये होईल. या विहिरींमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. तरीही नागरिक विहिरींचा उपयोग कचराकुंडी म्हणून करीत आहेत. काही विहिरींत पाणी असल्यामुळे त्या विहिरींची स्थिती चांगली आहे. या विहिरींवर ग्रामपंचायत काळात लाखो रुपये खर्च करण्यात आले. परंतु विहिरींची देखभाल न केल्यामुळे त्या विहिरी कचरामय झाल्या आहेत. वॉर्ड नंबर वीसमधील विहिरीची स्थिती चिंताग्रस्त झाली आहे. ती विहीर ग्रामपंचायत काळात बनविण्यात आली होती. नगर परिषदेचे या विहिरीकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप स्थानीय नागरिकांनी केला आहे.

उन्हाळ्यात पाण्याची समस्या निर्माण होईल, त्याकरिता नगर परिषदेने काही उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. परंतु नगर परिषदेने आतापर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. वाडीतील बहुतांश विहिरींची साफसफाई झालेली नाही. सार्वजानिक विहिरींची सफाई झाली तर काही प्रमाणात पाण्याची समस्या सुटू शकते. जीवन प्राधिकरण, वेणाचे पाणी सध्या कमी प्रमाणात मिळते. उन्हाळ्यात तर दोन दिवसांआड पाणी मिळते. त्यावर उपाययोजना म्हणून सार्वजनिक विहिरी स्वच्छ करणे गरजेचे आहे. त्या स्वच्छ केलेल्या विहिरींच्या पाण्याचा उपयोग नागरिकांना करता येईल, अन्यथा पाणीटंचाईच्या गंभीर समस्यांचा सामना नगर परिषदेला करावा लागेल.

नवनीतनगर, सदाचार सोसायटी, आंबेडकरनगरच्या विहिरी बंद अवस्थेत आहेत. ज्या विहिरी चांगल्या स्थितीत आहेत, त्या मध्ये नगर परिषद ब्लिचिंग पावडरसुद्धा टाकत नाही. त्यामधील पाणी पिण्यायोग्य नाही. कधीच विहिरीच्या पाण्याची तपासणी केली जात नाही, असा आरोप स्थानिक नागरिक करित आहेत.

उन्हाळा लक्षात घेता दोन दिवसांत विहिरींची सफाई करण्यासाठी आजच निविदा काढण्यात येईल. आठ दिवसांत या समस्येचे निवारण करू. पाणीपुरवठा टॅंकर व २७ नवीन बोरिंग करण्याचेसुद्धा प्रस्ताव आहेत. मागील वर्षीपेक्षा यावर्षी पाण्याची कमतरता भासू देणार नाही.
- राजेश भगत, मुख्याधिकारी, नगर परिषद वाडी

Web Title: common well garbage depo