बॅंकेने दिली व्याजासह भरपाई 

अरविंद ओझलवार 
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

उमरखेड (यवतमाळ) : 'एटीएम'मधून पैसे काढत असताना मशीन बंद पडल्याने पैसे निघाले नाहीत. तक्रार करूनही बॅंकेने दखल घेतली नाही. त्यामुळे ग्राहकाने उमरखेड येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखेकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत बॅंकेने ग्राहकाच्या खात्यात व्याजासह भरपाईची रक्कम दुसऱ्याच दिवशी जमा केली. 

उमरखेड (यवतमाळ) : 'एटीएम'मधून पैसे काढत असताना मशीन बंद पडल्याने पैसे निघाले नाहीत. तक्रार करूनही बॅंकेने दखल घेतली नाही. त्यामुळे ग्राहकाने उमरखेड येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखेकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत बॅंकेने ग्राहकाच्या खात्यात व्याजासह भरपाईची रक्कम दुसऱ्याच दिवशी जमा केली. 

तालुक्‍यातील चालगणी येथील शंकर कदम यांनी 13 ऑगस्टला विडूळ येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या 'एटीएम'मधून दहा हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, पैसे मोजत असतानाच काही तांत्रिक कारणांमुळे एटीएम बंद पडले. पैसे मशीनमध्येच अडकले. त्यामुळे त्यांनी लगेच त्यांचे बॅंक खाते असलेल्या भारतीय स्टेट बॅंकेच्या उमरखेड शाखेत जाऊन बॅंक व्यवस्थापक गणेश पवार यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी "एटीएम'वरील टोल फ्री क्रमांकावर ऑनलाइन तक्रार करण्याचा सल्ला दिला. कदम यांनी त्याचदिवशी ऑनलाइन तक्रार केली. बॅंकेकडून सात दिवसांत तक्रारीचे निवारण करण्यात येईल, असे सांगण्यात आले. परंतु, बॅंकेने दखलच घेतली नाही. अखेर, शंकर कदम यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा उमरखेडचे अध्यक्ष ऍड. विलास देवसरकर यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी बॅंकेशी चर्चा करून याप्रकरणी जिल्हा ग्राहक मंचात जाणार असल्याचे सांगितले. तसेच, भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या "फेल्ड ट्रान्झॅक्‍शन'बाबतचे दिशानिर्देशानुसार कारवाई करावी, अशी विनंती केली. त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत बॅंकेने तब्बल 73 दिवसांनंतर दहा हजार रुपयांसह 66 दिवसांचे प्रतिदिवस शंभर रुपयांप्रमाणे सहा हजार सहाशे रुपये कदम यांच्या भारतीय स्टेट बॅंकेच्या खात्यात जमा केले. 

पाच दिवसांत पैसे परत करण्याचे आदेश 
रिझर्व्ह बॅंकेने पैशांची देवाणघेवाण आठ वेगवेगळ्या वर्गांत विभागली आहे. यात एटीएममधून देवाण-घेवाण, कार्डवरून देवाण-घेवाण, तत्काळ पेमेंट सिस्टिम, युनिफाइड पेमेंट इंटरफेस आणि प्रीपेड कार्ड यांचा समावेश आहे. नवीन नियमानुसार ट्रान्झॅक्‍शन झाल्यानंतर पाच दिवसांत बॅंकेला ग्राहकांच्या खात्यात पैसे परत करावे लागणार आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Compensation with interest paid by the bank