यवतमाळात साकारतोय शिक्षणाचा 'एकलव्य' पॅटर्न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जून 2019

मागील तीन वर्षांमध्ये ५० पेक्षा जास्त विद्यार्थी TISS (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स), APU (अजीम प्रेमजी युनिव्हर्सिटी) सारख्या जागतिक नामवंत संस्थेत शिक्षण घेत आहेत काहींनी शिक्षण पूर्ण करून समाजाच्या विकासाच्या दृष्टीने कार्य करीत आहे.

यवतमाळ : ग्रामीण महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात आपण बघतोय स्पर्धा परीक्षा नावाच्या रोगाने ग्रामीण युवकांना ग्रासलेले आहे. क्षमता असूनही या स्पर्धात्मक क्षेत्राचे युवक बळी पडत आहे. पण या परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामीण युवकांची ताकद ओळखून प्रा. राजू केंद्रे या तरुण शिक्षकाच्या संकल्पनेतून तीन वर्षांपूर्वी 'एकलव्य अकॅडमी'ची स्थापना झाली, ज्या माध्यमातून देशातील उच्च शिक्षण संस्थेत प्रवेश मिळण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.

मागील तीन वर्षांमध्ये ५० पेक्षा जास्त विद्यार्थी TISS (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स), APU (अजीम प्रेमजी युनिव्हर्सिटी) सारख्या जागतिक नामवंत संस्थेत शिक्षण घेत आहेत काहींनी शिक्षण पूर्ण करून समाजाच्या विकासाच्या दृष्टीने कार्य करीत आहे. सावित्री जोतीराव समाजकार्य महविद्यालयात शुक्रवारी (ता. २) प्रा. रमाकांत कोलते, प्राचार्य डॉ. अविनाश शिर्के व प्रा. घनश्याम दरणे या मान्यवरांच्या उपस्थितीत ह्या वर्षी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार पार पडला. या समारंभात २० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

'एकलव्य अकॅडमी'तील ९०% विद्यार्थी मजुरी करणाऱ्या कुटुंबातून किंवा शेतकरी कुटुंबातून येतात, ज्यांची पहिलीच पिढी पदवीचे शिक्षण घेत आहे. एका छोट्याशा गावातून सुरू झालेली चळवळ आता राज्यभर विस्तारलेली आहे, येत्या काळात ही चळवळ देशभर पोहचेल असा विश्वास प्रा. घनश्याम दरणे यांनी व्यक्त केला आहे. या सर्व प्रक्रियेत सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालयच्या प्राध्यापकवृंदानी व विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासून मोलाची भूमिका पार पाडली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: competitive exam classes in Yavatmal