आणखी एका पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

खामगाव - तालुक्‍यातील पाळा येथील स्व. निंबाजी कोकरे निवासी आदिवासी आश्रमशाळेतील आणखी एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार शनिवारी (ता. पाच) हिवरखेड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या निवासी आश्रमशाळेतील वसतिगृहात एकूण 104 विद्यार्थिनी वास्तव्यास होत्या. यातील हलखेडा ता. मुक्ताईनगर (जिल्हा जळगाव) येथील सहा विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. आता आणखी एक तक्रार दाखल झाली असून, पीडित विद्यार्थिनींची संख्या दोन झाली आहे. दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आश्रमशाळेला भेट दिली.

या शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणात पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये आज मुख्य आरोपी इतूसिंग काळूसिंग पवार (रा. उमरा) याने याच कालावधीत आणखी एका पीडितेवर अत्याचार केल्याची तक्रार प्राप्त झाली. तक्रारीवरून इतूसिंग पवारविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. अन्य आरोपींविरुद्ध पोक्‍सो कायद्यान्वये तसेच बालन्याय (काळजी व संरक्षण) अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती विशेष तपासपथक प्रमुख अपर पोलिस अधीक्षक श्‍वेता खेडेकर यांनी दिली आहे.

दरम्यान, विद्यार्थिनींची सुरक्षा व सुविधेची व्यवस्था नसलेल्या राज्यातील सर्व शाळांची मान्यता रद्द करावी, पाळा येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींचे अन्य आश्रमशाळेत त्वरित समायोजन करावे, अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी खामगाव येथे केली. विजया रहाटकर यांनी आज पाळा येथील स्व. निबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेची पाहणी केली.

पत्रकार परिषदेला भाजपच्या नेत्या श्‍वेता महाले, आमदार आकाश फुंडकर यांची उपस्थिती होती. 'मी आज पाळा येथील आदिवासी आश्रमशाळेची पाहणी करून या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. या आश्रमशाळेत सुरक्षा तसेच अन्य सुविधा नाहीत. आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी शाळेची मान्यता रद्द केली आहे. आता तेथील विद्यार्थी व विद्यार्थिनींना अन्य शाळेत प्रवेश द्यावा. राज्यातील सर्वच आदिवासी आश्रमशाळांची तपासणी करून विद्यार्थिनींची सुरक्षा व अन्य सुविधा नसलेल्या सर्व शाळांची मान्यता रद्द करावी,'' अशी मागणी विजया रहाटकर यांनी केली. पाळा येथील आश्रमशाळेमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे राज्यातील सर्वच आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. महिला आयोग याबाबत गंभीर पावले उचलणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. पाळा येथील पीडित मुलीला मनोधैर्य योजनेतून दोन लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित अशा सर्व आश्रमशाळा शर्ती व अटींचे पालन करीत नाहीत. सखोल अभ्यास करून अशा शाळांमधील विद्यार्थिनींची सुरक्षा व सुविधांबाबत शासनाला अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोपींची संख्या 15
अत्याचारप्रकरणी आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली. आता आरोपींची संख्या 15 झाली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये बाळकृष्ण वाघे, साहेबराव कोकरे, अनिल कोकरे, मोहन कोकरे या शाळेतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पीडित मुलींची संख्या सहा सांगितली जात असली, तरी या मुलींची वैद्यकीय तपासणी झालेली नाही. त्यांचे बयाण नोंदविण्यात आल्याचे कळते. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी गठित करण्यात आलेली आहे.

Web Title: a complaint with the girl