सावकाराविरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मे 2019

चंद्रपूर : कर्जाचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या सावकाराने कर्जदाराच्या मुलाला आणि पत्नीला पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना मंगळवारी (ता. 7) चंद्रपुरात घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी जसबीर भाटिया ऊर्फ सोनू याच्याविरोधात जिवे मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत तोही जखमी झाला आहे.

चंद्रपूर : कर्जाचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या सावकाराने कर्जदाराच्या मुलाला आणि पत्नीला पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना मंगळवारी (ता. 7) चंद्रपुरात घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी जसबीर भाटिया ऊर्फ सोनू याच्याविरोधात जिवे मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत तोही जखमी झाला आहे.
सरकारनगरात हरिश्‍चंद्र हरिणखेडे राहतात. त्यांनी जसबीर भाटिया ऊर्फ सोनू या सावकाराकडून तीन लाखांचे कर्ज घेतले होते. यातील दोन लाख रुपये हरिणखेडे यांनी परत केले. उर्वरित रकम हरिणखेडे देणार होते. मंगळवारी भाटिया हरिणखेडे यांच्या घरी आला. तेव्हा हरिणखेडे यांचा मुलगा पीयुष आणि पत्नी कल्पना होते. पैसे देण्याच्या कारणावरून जसबीरने पीयुषशी वाद घातला. त्यानंतर जसबीरने गाडीतून पेट्रोल आणून पीयुष आणि कल्पना यांच्यावर शिंपडून त्यांना पेटविले. यात पीयुष आणि कल्पना भाजल्या गेले. जसबीरही किरकोळ भाजला. या घटनेनंतर त्याने तेथून पळ काढला होता. शेजारचे धावून आल्याने दोघांचे प्राण वाचले. पीयुष आणि कल्पना यांच्यावर पोद्दार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी जसबीर भाटिया याच्यावर गुन्हा दाखल केला. तोही सध्या जखमी असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला सुटी मिळाल्यानंतर अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
कारवाई करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
या घटनेची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिस अधीक्षकांना दिले आहे. जिल्ह्यात अवैध सावकारीच्या वाढत्या घटनांवर प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी पोलिस अधीक्षकांना दिले आहेत.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: complaint regirstered against saavkar