गोंदिया जिल्ह्यात अनेक मतदान केंद्रांवर गोंधळात गोंधळ

File photo
File photo

गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, गोंदिया, तिरोडा आणि आमगाव या चार विधानसभा मतदारसंघांमध्ये आज, सोमवारी मतदान पार पडले. मात्र, मतदारांना दोन-तीन मतदान केंद्रांवर मतदानयंत्रातील बिघाडाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना कुठे अर्धा तास तर, कुठे तासभर ताटकळत बसावे लागले. बहुतांश मतदान केंद्रांवरील मतदार याद्यांमध्ये मतदारांच्या नावावर "डिलीट' असा शिक्का होता. म्हणजेच त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले होते. त्यामुळे अशा मतदारांना मतदानासाठी केंद्रावर येऊनही परत जावे लागले. दुपारी 3 पर्यंत मतदानाची वेळ असलेल्या आमगाव व अर्जुनी मोरगाव या नक्षलग्रस्त भागात मतदारांनी उत्स्फूर्त मतदान केले. सकाळी 9 पर्यंत मतदानाला अल्प प्रतिसाद मिळाला असला तरी, नंतर मतदान केंद्रस्थळी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघातील 316 मतदान केंद्रे, तिरोडा 295, गोंदिया 361 तर, आमगाव विधानसभा मतदार संघातील 310 अशा एकूण 1282 मतदान केंद्रांवर सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. गोंदिया व तिरोडा विधानसभा मतदारसंघांमध्ये सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान झाले. अर्जुनी मोरगाव व आमगाव या विधानसभा मतदारसंघात सुरक्षेच्या दृष्टीने सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. चारही मतदार संघात सकाळी मतदानाला अल्प प्रतिसाद मिळाला. सकाळी 9 पर्यंत अर्जुनी मोरगाव मतदारसंघात 12.76 टक्के, तिरोडा, 5.22, गोंदिया 6.05 तर, आमगाव मतदारसंघात 12.89 टक्के मतदान झाले होते. जसजसा सूर्य वर सरकू लागला तसतशी मतदारांची पावले मतदान केंद्रांच्या दिशेने वळू लागली. त्यामुळे मतदान केंद्रांवर गर्दी होऊ लागली. दुपारी 1 वाजेपर्यंत चारही मतदारसंघांमध्ये एकूण 40.33 टक्के मतदान झाले. यातही अर्जुनी मोरगाव मतदारसंघात 51.62 तर, आमगावात 47.85 टक्के मतदान झाले. गोंदिया मतदारसंघात 31.86 तसेच तिरोडा मतदारसंघात 32.07 टक्के मतदान झाले.

मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना मात्र मतदान यंत्रातील बिघाडाचा सामना करावा लागला. तिरोडा तालुक्‍यातील पांजरा येथील बूथ क्रमांक 66 मधील मतदान यंत्रात सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी बिघाड झाला. त्यामुळे अर्धा तास मतदारांना ताटकळत बसावे लागले. अर्जुनी मोरगाव तालुक्‍यातील खांबी येथील बूथ क्रमांक 222 मध्ये मतदान यंत्र बंद पडल्याने मतदार परत गेले. त्यामुळे त्यांनी मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी केली. आमगाव मतदारसंघातील तिगाव मतदान केंद्रातील मतदान यंत्र सकाळी 8 वाजता बंद पडले. त्यानंतर सुमारे 50 मिनिटांनी दुसरे यंत्र लावण्यात आले. या यंत्रातसुद्धा साडेदहाला बिघाड झाला. त्यामुळे दीड तास मतदारांना ताटकळत बसावे लागले. पिंडकेपार येथील मतदान केंद्राच्या बूथ क्रमांक 9 मधील मतदान यंत्र तीन जणांचे मतदान झाल्यानंतर बिघडले. दुसरे यंत्र लावल्यानंतर अर्ध्या तासाने मतदानाला सुरुवात झाली.
आमगाव मतदारसंघातील नानव्हा येथील पूर्व माध्यमिक शाळेच्या बूथवरील व्हीव्हीपॅट मशीन सकाळी दहाला बंद पडली. त्यामुळे एक तास मतदान प्रक्रिया थांबली होती. दुसरी मशीन लावल्यानंतर मतदानाला सुरुवात झाली.
दुसरीकडे मतदार यादीमध्ये नाव, अनुक्रमांक, वॉर्डात अदलाबदल झाल्याने मतदारांना मोठी कसरत करावी लागली. हा प्रकार गोंदिया मतदारसंघासह तिरोडा, अर्जुनी मोरगाव मतदारसंघातही घडला. डव्वा परिसरातील मतदार यादीत त्रुटी असल्याने बहुतांश मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. मतदार यादीत नाव नोंदणी करूनसुद्धा नवमतदारांची नावे यादीत नसल्याने त्यांना आल्यापावली परत जावे लागले. काही मतदारांची नावे दोनदा आढळली. काही जिवंत मतदारांच्या नावावर "डिलीट' असा शिक्का असल्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले.

बहिष्कार टाकूनही केले मतदान
अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील बंध्या येथील नागरिकांनी प्रलंबित विविध मागण्यांसाठी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. तसे निवेदन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाही दिले होते. मात्र, ठाणेदार महादेव तोंडले यांनी नागरिकांची समजूत काढून मतदान करण्यास प्रवृत्त केले. त्यांच्या विनंतीला मान देऊन मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन उत्स्फूर्तपणे मतदान केले.

47 उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद
गोंदिया मतदारसंघात एकूण 18, अर्जुनी मोरगाव 8, तिरोडा 12 तर, आमगाव मतदारसंघात 9 असे एकूण 47 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी आज मतदान यंत्रात बंद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com