पाण्यासाठी कॉंग्रेसचा महापौरांना घेराव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

अनेक भागांत टंचाई - दूषित, कमी पाणीपुरवठ्याने संताप

अनेक भागांत टंचाई - दूषित, कमी पाणीपुरवठ्याने संताप
नागपूर - शहरातील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, काही भागांत दूषित पाणी येत आहे. वारंवार तक्रार करूनही अधिकारी लक्ष देत नाहीत, असा आरोप करीत सोमवारी विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर व शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात नगरसेवक व नागरिकांनी महापौरांचा कक्षात तासभर घेराव केला. महापौर नंदा जिचकार यांना निवेदन देऊन समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

शहरातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी ओसीडब्ल्यू कंपनीला देण्यात आली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांना नगरसेवकांनी संबंधित समस्येबाबत अनेकदा तक्रारी केल्या; परंतु याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कॉंग्रेस नेत्यांनी केला. ताजबाग परिसरात दूषित पाणी येत आहे. लुंबिनीनगर, इंदोरा, मोहननगर, पूर्व नागपुरातील काही भाग व उत्तर नागपुरातील भागात पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार घेऊन विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, नगरसेवक मनोज सांगोळे, नगरसेविका हर्षला साबळे, दर्शनी धवड यांच्यासह अनेक नगरसेवक व नगरसेविका नागरिकांसह महापालिकेवर धडकल्या.

महाकाळकर व ठाकरे यांच्या नेतृत्वात नगरसेवक व नागरिकांनी महापौर कक्षात ठाण मांडले. महापौर नसल्याने जोरदार घोषणाबाजी केली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आयुक्तांना निवेदन दिले; परंतु महापौर येईपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका घेतली. महापौर आल्यानंतर महाकाळकर व ठाकरे यांनी शहरातील पाणीसमस्या, वाढीव पाणी बिल, नळ बंद करण्याची नोटीस आदी मुद्द्यांवर महापौरांशी चर्चा केली.

कॉंग्रेसमधील दुहीचे दर्शन
शहरातील पाणीसमस्येबाबत महापालिकेवर धडक देण्यासाठी आयोजित आंदोलनात कॉंग्रेसमधील काही नगरसेवकांची अनुपस्थिती दिसून आली. महाल भागात पाण्यासाठी आंदोलन करणारे बंटी शेळके, उत्तर नागपुरातील संदीप सहारे व दक्षिण-पश्‍चिममधील प्रफुल्ल गुडधे पाटील अनुपस्थित असल्याने आंदोलनातही कॉंग्रेसमधील दुही स्पष्ट झाली.

शहरातील पाणीसमस्येवर निश्‍चितच तोडगा काढण्यात येईल. सर्वांना समान पाणी मिळणे आवश्‍यक असून, अधिकाऱ्यांची बैठक तत्काळ बोलविण्यात येईल. संबंधित अधिकाऱ्यांशीही चर्चा करून समस्या सोडविणार.
- नंदा जिचकार, महापौर.

शहरातील अनेक भागांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हात नागरिकांना पायपीट करावी लागत असतानाच वाढीव बिले पाठवून नागरिकांच्या समस्येत भर टाकली जात आहे.
- संजय महाकाळकर, विरोधी पक्षनेते.

Web Title: congreaa agitation for water