कॉंग्रेसचे 11 जानेवारीपासून नोटाबंदीविरोधात जनआंदोलन - पुनिया

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला असून, या निर्णयाच्या विरोधात कॉंग्रेस पक्षातर्फे येत्या 11 जानेवारीपासून देशभर व्यापक जनआंदोलन सुरू करणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता खासदार पी. एल. पुनिया यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

पुनिया म्हणाले, 'गेल्या आठ नोव्हेंबरला घेतलेल्या नोटाबंदीच्या घोषणेला 50 दिवस झाले आहेत. लोकांच्या समस्या सुटण्याऐवजी अधिक गुंतागुंतीच्या झाल्या आहेत. लोकांचे पैसे बॅंकेत जमा असताना काढता येत नाहीत. एटीएम मशिन बंद आहेत. शेतकरी, मजूर, व्यापाऱ्यांना नोटाबंदीचा फटका बसल्याने देशात आर्थिक अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. सुमारे 22 लाख लोकांना रोजगार गमवावा लागणार आहे. येत्या 11 जानेवारीला दिल्लीत होणाऱ्या कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत नोटाबंदीच्या विरोधात जनआंदोलनाची सुरवात होईल.''

सध्याच्या परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी सरकारने कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. कॅशलेस व डिजिटल व्यवहारांची घोषणा या किरकोळ उपाययोजना आहेत. या नोटाबंदीमुळे बॅंकांच्या रांगांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या 115 लोकांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात यावी, या नोटाबंदीमुळे किती काळा पैसा बाहेर आला व दहशतवादावर कसे नियंत्रण आले, याची माहिती पंतप्रधानांनी द्यावी. सहारा व बिर्ला समूहाने पंतप्रधान मोदींना दिलेल्या लाचेच्या आरोपाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

या वेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, नागपूर शहर कॉंग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे उपस्थित होते.

Web Title: Congress 11 January agitation currency ban oppose