विदर्भातील कॉंग्रेस जणांचा उत्साह दुणावला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

नागपूर - मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला मिळालेल्या विजयाने विदर्भातील कॉंग्रेसच्या नेत्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. काही वर्षांपासून मरगळ आलेल्या कॉंग्रेस जणांमध्ये दोन्ही राज्यांतील विजयाने उत्साह संचारल्याचे दिसून येत आहे. 

नागपूर - मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला मिळालेल्या विजयाने विदर्भातील कॉंग्रेसच्या नेत्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. काही वर्षांपासून मरगळ आलेल्या कॉंग्रेस जणांमध्ये दोन्ही राज्यांतील विजयाने उत्साह संचारल्याचे दिसून येत आहे. 

मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या सीमा विदर्भाला लागून आहेत. दोन्ही राज्यांमध्ये काही मतदारसंघांवर मराठी भाषकांचे प्राबल्यही आहे. त्यामुळेच विदर्भातील अनेक नेत्यांना पक्षाचे निरीक्षक म्हणून दोन्ही राज्यांमध्ये पक्षाने पाठविले होते. आमदार सुनील केदार (नागपूर), आमदार गोपाल अग्रवाल (गोंदिया), माजी खासदार नाना पटोले, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, माजी आमदार नामदेव उसेंडी (गडचिरोली), माजी आमदार अशोक धवड, माजी खासदार गेव्ह आवारी, युवक कॉंग्रेसचे बंटी शेळके, आयटी सेलचे अभिजित सपकाळ, रवींद्र दरेकर, कमलेश समर्थ, प्रकाश वसू आदींनी दोन्ही राज्यांमध्ये पक्षाचे निरीक्षक म्हणून काम केले. छत्तीसगडमधील कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जाहीर सभांच्या समन्वयाची जबाबदारी प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्याकडे होती. छत्तीसगडमध्ये राहुल गांधींनी 19 जाहीर सभा व रॅली केल्या. 

दोन्ही राज्यांमध्ये मिळालेल्या यशाने कॉंग्रेसच्या नेत्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या विदर्भात काही निवडणुकांमध्ये कॉंग्रेसची कामगिरी चांगली नव्हती. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे सारे उमेदवार पराभूत झाले होते. विधानसभा निवडणुकीमध्येही कॉंग्रेसचे केवळ नऊ आमदार निवडून आले. दोन्ही राज्यांना लागून असलेल्या नागपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांतून तर केवळ दोन आमदार निवडून आले आहेत. शेजारी राज्यांमध्ये मिळालेल्या यशाने कॉंग्रेसच्या नेत्यांनाही उभारी मिळाल्याचे चित्र आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये विदर्भातसुद्धा कॉंग्रेसला "अच्छे दिन' येतील, असा आशावाद नेत्यांनी व्यक्त केला. 

मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या मोठ्या राज्यांमध्ये कॉंग्रेसने वापसी केल्याने भाजपचे काउंटडाऊन सुरू झाल्याचे दिसत आहे. तिन्ही राज्यांतील विजयाचे खरे दावेदार कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आहेत. भाजपने दिलेली आश्‍वासने फोल ठरली. याउलट नोटाबंदीसारखा निर्णय घेऊन सुरू असलेले व्यवसाय बंद पाडले. याविरोधात जनतेने मतदान केले. 
- डॉ. सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री. 

खोटे बोलणे व दिलेली आश्‍वासने पाळल्या जात नसल्याने जनतेमध्ये मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष उफाळला होता. गरीब, शेतकरी, मागासवर्गीय जनता भाजपच्या एककल्ली कारभाराला कंटाळली होती. त्याचा फटका भाजपला पाच राज्यांच्या निवडणुकीत बसला. सोबतच राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसचे कार्यकर्ते चार वर्षांपासून सातत्याने कामाला लागले होते. 
- डॉ. नितीन राऊत, राष्ट्रीय अध्यक्ष, कॉंग्रेस अनुसूचित जाती-जमाती सेल. 

कॉंग्रेस जनतेच्या मनामनांत रुजलेला पक्ष आहे. देशातून कॉंग्रेसला संपवणे अशक्‍य आहे. हेच पाच राज्यांच्या निकालावरून स्पष्ट होते. दिशाभूल, घोषणा आणि जुमलेबाजी करून एखाद्यावेळीच जनतेची फसवणूक करता येते. चलाखी जास्तवेळ चालत नाही. केंद्रासोबत राज्यातील सत्ताधाऱ्यांचाही कारभार असाच सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही भाजपच्या हातून कॉंग्रेस सत्ता पुन्हा हिसकावून आणेल. 
- विकास ठाकरे, शहर अध्यक्ष, कॉंग्रेस. 

कॉंग्रेसमुक्तीचे स्वप्न बघणाऱ्या भाजपला पाच राज्यांनी चांगलाच हिसका दाखवला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांची सत्ताच कॉंग्रेसने भाजपकडून हिसकावून घेतली असून, देशभरात परिवर्तनाला सुरुवात झाली आहे. नोटाबंदी, इंधन दरवाढ, शेतकऱ्यांची उपेक्षा, रोजगाराचे पोकळ दावे केल्याने भाजपने जनतेचा रोष ओढवून घेतला आहे. चार वर्षांची मोदी-शहा यांची राजवट बघून कॉंग्रेसच किती चांगली हे जनतेला कळले आहे. आता महाराष्ट्रातही परिवर्तन होईल. 
- राजेंद्र मुळक, अध्यक्ष, नागपूर जिल्हा, कॉंग्रेस. 

पाच राज्यांतील निवडणुकांपैकी भाजपला एकाही राज्यात सत्ता मिळविता आली नाही. शेतकरी, बेरोजगारी, उद्योगधंदे, महागाई, जीएसटी, नोटाबंदी, भ्रष्टाचार, अल्पसंख्याकांच्या प्रश्‍नांवर तोडगा काढण्यात भाजप अपयशी ठरली. मोठ-मोठी आश्‍वासने दिल्यामुळे जनतेने भाजपला केंद्रात बसविले होते. निवडून आल्यानंतर खोट्या आश्‍वासनांची पूर्तता करण्यात भाजप फोल ठरली. अपेक्षाभंग झाल्यामुळे भाजपच्या विरोधात जनतेने मतदान केले. 
- डॉ. आशीष देशमुख, माजी आमदार. 

भाजपने छत्तीसगडमध्ये ओबीसी, एससी आणि एसटी समाजाला कुठलेच महत्त्व दिले नाही. त्यांना विभाजित करून 15 वर्षे सत्ता उपभोगली. यंदा प्रथमच तिन्ही समाजाला कॉंग्रेसने एकजूट केले आणि त्याचे चांगले परिणाम समोर आले. केंद्राने केलेली नोटाबंदी, जीएसटीमुळे अनेकांचे रोजगार गेले. व्यवसाय बंद पडले. एकाधिकार शाहीमुळे भ्रष्टाचार फोफावला होता. त्याविरोधात जनतेने कौल दिला. 
- प्रफुल्ल गुडधे, राहुल गांधी यांचे छत्तीसगडमधील प्रचार समन्वयक. 

संविधान बदलण्याचा भाजपचा छुपा अजेंडा होता. सत्तेवरच येतात त्यांनी त्या दिशेने प्रयत्न सुरू केले होते. संवैधानिक अनेक संस्था मोडीत काढणे सुरू केले होते. आरबीआय, सीबीआयमध्ये हस्तक्षेप केला. इतर संस्था आपल्या ताब्यात राहाव्यात यासाठी घटनादुरुस्ती केली जात होती. मोदी-शहा यांच्या हिटलरशाहीच्या विरोधात जनतेने कौल देऊन त्यांचे मनसुबे उधळून लावले आहेत. 
- त्रिशरण सहारे, राष्ट्रीय समन्वयक, इंटक. 

सत्ता आल्यानंतर भाजपच्या नेत्यांना अहंकार चढला होता. आपले कोणीच बिघडवू शकत नाही. आणखी 20 वर्षे देशावर राज्य करू अशा आविर्भावात देशाचा कारभार करणे सुरू केले होते. देशाचा व जनतेचा कुठलाही विचार न करता नोटाबंदी जाहीर केली. त्यातून काळापैसा तर आला नाही उलट गरीब व युवकांचा रोजगार गेला. अनेकांचे व्यवसाय बुडाले. शेतकऱ्यांना दुय्यम वागणूक दिली. त्यांच्यावर लाठीमार केला. याच प्रमुख कारणांमुळे भाजपचा पराभव झाला. 
- प्रवीण कुंटे पाटील, प्रवक्ता, राष्ट्रवादी कॉंग्रेस. 

जनतेला भूलथापा देऊन जास्तकाळ सत्तेवर राहता येत नाही हे भाजपला आता तीन राज्यांमधील निवडणुकीच्या निकालावरून उमगले असेल. अवास्तव घोषणा करणे, जनतेला मूर्ख समजणे आणि सत्तेवर आहो म्हणून काहीही करता येते अशीच भूमिका भाजपची राहिली. केंद्र सरकारच्या हिटलरशाही कार्यपद्धतीने जनतेत असंतोष उफाळला आहे. 
- दुनेश्‍वर पेठे, गटनेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस. 

कॉंग्रेसच्या मंदगतीच्या निर्णयप्रक्रियेमुळे गल्ली ते दिल्लीपर्यंत नागरिकांनी भाजपवर विश्‍वास टाकला आणि सत्तेत आणले. परंतु, सत्तेत येताच भाजप कार्यकर्त्यांची मुजोरी वाढत गेली. अहंकाराने संघाचे संस्कार बाजूला पडले. भाजप नेतेही सातव्या अस्मानात उडत होते. पाच राज्यांच्या विधानसभा निकालांनी अहंकार व मुजोरीचा पराभव केल्याचे दिसून येत आहे. आता तरी कुणालाही कमी न लेखता सर्वसामान्य लोकांशी वागणुकीत आमूलाग्र बदल करावा अन्यथा रामाचे भक्त म्हणविणाऱ्यांना रावणाच्या गर्वहरणाची कथा माहीतच आहे. 
- हेमंत गडकरी, प्रदेश सरचिटणीस, मनसे. 

मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये जनतेने राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. सोबतच संविधानाचे राज्य नष्ट करण्याच्या संघवादी भाजप सरकारला घरी बसवले. दलित, शोषित, पीडित जनतेला मनुवादी व्यवस्थेकडे घेऊन जाणाऱ्या भाजपच्या प्रयत्नांना तिन्ही राज्यातील सुज्ञ नागरिकांनी नाकारले. 
- ऍड. नंदा पराते. 

लोकसभा व त्यानंतर भाजपला मिळालेला विजय ईव्हीएममुळे झाला असा आरोप कॉंग्रेसतर्फे केला जात होता. बॅलेटने निवडणूक घेण्याची मागणी केली जात होती. तीन राज्यांमध्ये सत्ता आल्यानंतर कॉंग्रेसचे नेत ईव्हीएमवर एकही शब्द बोलायला तयार नाही. पराभव झाला तर ईव्हीएममुळे आणि विजय मिळाला तर राहुल गांधी यांच्यामुळे, ही दुटप्पी भूमिका जतनेला कळली आहे. 
- कृष्णा खोपडे, आमदार पूर्व नागपूर. 

Web Title: Congress activists celebration victory