कॉंग्रेस नगरसेवकाला लिंबूपाणी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

नागपूर - सात दिवसांपासून शहरातून खासगी कंपन्यांची सेवा रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले नगरसेवक बंटी शेळके यांचे उपोषण गुरुवारी आयुक्तांनी लिंबूपाणी देऊन सोडविले. टप्प्याटप्प्याने समस्या सोडविण्यात येतील, असे आश्‍वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले. 

नागपूर - सात दिवसांपासून शहरातून खासगी कंपन्यांची सेवा रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले नगरसेवक बंटी शेळके यांचे उपोषण गुरुवारी आयुक्तांनी लिंबूपाणी देऊन सोडविले. टप्प्याटप्प्याने समस्या सोडविण्यात येतील, असे आश्‍वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले. 

एसएनडीएल, ओसीडब्ल्यू व कनक रिसोर्सेस या खासगी कंपनीच्या तावडीतून सर्वसामान्यांची सुटका करण्यासाठी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष तसेच नगरसेवक बंटी शेळके यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी उपोषण सुरू केले. सात दिवसांपासून शेळके यांच्यासह प्रशांत तन्नेरवार, शाहिद खान व वसीम शेख यांचे उपोषण सुरू होते. मंगळवारी दुपारी आयुक्तांनी उपोषणमंडपाला भेट देऊन शेळके यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. आयुक्तांच्या हस्ते लिंबूपाणी घेत शेळके यांनी उपोषणाची सांगता केली. 

या वेळी माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार अशोक धवड, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, तानाजी वनवे, संदीप सहारे, रमेश पुणेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दुनेश्‍वर पेठे, नगरसेविका जीशान मुमताज, हर्षला साबळे, दर्शनी धवड आदी होत्या. 

महापौरांनी टाळले 
महापालिका सभेनंतर नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी महापौर नंदा जिचकार यांना उपोषणस्थळी भेट देण्याची विनंती केली. परंतु, यापूर्वी नगरसेविका हर्षला साबळे उपोषणावर असताना महापौर त्यांना भेट देण्यास गेल्या होत्या. परंतु, त्यांनी महापौर नको, आयुक्तांना बोलवा, अशी भूमिका घेतली. त्यामुळे महापौर नंदा जिचकार यांनी संभाव्य अपमान टाळण्यासाठी शेळके यांच्या उपोषण मंडपात जाण्याचे टाळले. 

शहर कॉंग्रेस अध्यक्षांचीही पाठ 
कॉंग्रेसच्या अनेक नगरसेवकांनी नगरसेवक बंटी शेळके यांच्या उपोषणस्थळाला भेट दिली. मात्र, शहर कॉंग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांनी शेळके यांच्या उपोषण मंडपाला भेट देण्याचे टाळले. त्यामुळे नागरिकांना पुन्हा कॉंग्रेसमधील दुहीचा अनुभव आला. 

Web Title: Congress corporator with lemon water