काँग्रेस नगरसेवकांचा सभेत गोंधळ; नगरसेवक निलंबित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

शहरातील मुख्य रस्त्यांवरील पथदिव्यांसाठी शासनाकडून 20 कोटी मिळाले. या निधीतून प्रस्तावित काम नगरसेवकाला विश्‍वासात न घेता परस्पर इतर प्रभागात वळती करण्यात आले. याचा जाब सभागृहात विचारण्यासाठी उभे झालेले विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस सदस्यांना बोलण्यास मनाई करण्यात आली.

अकोला- शहरातील मुख्य रस्त्यांवरील पथदिव्यांसाठी शासनाकडून 20 कोटी मिळाले. या निधीतून प्रस्तावित काम नगरसेवकाला विश्‍वासात न घेता परस्पर इतर प्रभागात वळती करण्यात आले. याचा जाब सभागृहात विचारण्यासाठी उभे झालेले विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस सदस्यांना बोलण्यास मनाई करण्यात आली. त्यावरून सभागृहात सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. विरोधी पक्ष नेत्यांनी डायस फेकून दिला. नगरसेवकाने राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त झालेले महापाैर विजय अग्रवाल यांनी आधी विरोधी पक्ष नेते व काँग्रेसच्या एका सदस्याला निलंबित केले. त्यानंतर विरोधी पक्ष नेत्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव घेवून तो मंजूर करण्यात आला.

अकोला महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी दुपारी 12.30 वाजता आयोजित करण्यात आली होती. शहर स्वच्छतेच्या मुद्यावर ठराव घेण्याच्या उद्देशाने ही सभा महत्त्वाची होती. मात्र, सभा सुरू होताच विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे साजिद खान पठाण यांनी प्रभाग क्रमांक 1 मधील पथदिव्यांचा 40 लाखांचा निधी झोन बदली करून वळती का करण्यात आला, याचे स्पष्टीकरण सभागृहात देण्याची मागणी केली. त्यावर महापाैरांनी हा विषय आता सभागृहात घेता येणार नाही, असे सांगून चर्चा टाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काँग्रेसचे सर्वच सदस्य महापाैरांपुढील मोकळ्या जागेत एकत्र झाले आणि महापाैरांच्या एकाधिकारशाहीचा निषेध करू लागले. महापाैरही सदस्यांचे काहीही एेकून घेण्यास तयार नव्हते.

दरम्यान, विरोधी पक्ष नेत्यांनी डायस फेकल्याने सभागृहाचे वातावरण तापले. त्यावर महापाैरांनी विरोधी पक्ष नेत्याला निलंबित करण्यात अाले असून, त्यांना सभागृहाबाहेर काढण्याचे निर्देश दिले. त्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या गोंधळातच नगरसेवक मोहम्मद इरफान यांनी राजदंड उचलून तो सभागृहाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षांनी त्यांच्या हातातून तो काढून घेत जागेवर ठेवला. या कारणास्तव इरफान यांनाही निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश महापाैरांनी दिला. दोघांनाही बाहेर जाण्यास सांगण्यात आले. मात्र, ते बाहेर जाण्यास तयार नसल्याने पोलिसांना बोलाविण्यात आले. पोलिसांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. परंतु, साजिद खान यांनी बळजबरी केल्यास सभागृहात ‘राडा’ करण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांची पोलिसांनी समजूत काढली.

महापाैरांनी दोघांनाही बाहेर काढल्याशिवाय पुढे सभागृह चालू न देण्याचा निर्णय घेतला. अखेर काँग्रेस सदस्य बाहेर निघून गेल्यावर सभा पुढे सुरू झाली. तब्बल अर्धातास हा गोंधळ सुरू होता. 

काँग्रेसचा सभात्याग 
महापाैर सभागृहात मनमानी करीत असल्याचा आरोप करीत काँग्रेस सदस्यांनी विरोधी पक्ष नेते व नगरसेवकाच्या निलंबनाचा निषेध करीत सभात्याग केला. साजिदखान पठाण, इकबाल सिद्धिकी, डाॅ. झिनान हुसेन, इरफान खान, पराग कांबळे यांच्यासह काँग्रेसचे सर्वच सदस्य सभागृहातून बाहेर पडले.

Web Title: Congress Corporator suspended In Akola MNP