शेतकरी, बेरोजगारीवर काँग्रेसचा ‘फोकस’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शेतकरी, बेरोजगारांच्या प्रश्‍नावर काँग्रेसचा ’फोकस’ राहील, अशी माहिती काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.

यवतमाळ - केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. संघटनात्मक बांधणी व राजकीय परिस्थितीची चाचपणी करण्यासाठी जिल्हानिहाय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराला सुरुवात झाली असून आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शेतकरी, बेरोजगारांच्या प्रश्‍नावर काँग्रेसचा ’फोकस’ राहील, अशी माहिती काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.

विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (ता.23) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, दिल्ली येथील अधिवेशनात महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आले. काँग्रेस पक्षाला कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल करावयाचा आहे. उत्पन्नवाढ, शेतकरी सन्मान, शिक्षण, आरोग्य सेवा, बेरोजगारांच्या हाताला काम आदी महत्त्वपूर्ण विषय आहेत. भाजप सरकारची कर्जमाफी पोकळ घोषणा ठरली. आमचे सरकार आल्यास 2009 प्रमाणे कर्जमाफी देऊ, असे आश्‍वासन खासदार चव्हाण यांनी दिले.

मंत्रालयात आत्महत्या होत असताना सरकार केवळ जाळी लावत आहे. त्यापेक्षा प्रश्‍न निकाली काढावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यवतमाळ जिल्ह्यात मार्केटमध्ये भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांच्या मालाला भाव मिळत नाही. वाहतुकीचा खर्च निघत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. महागाव तालुक्यातील बिजोरा येथील शेतकर्‍याने पिकात गुरे सोडली, तूर उत्पादकांना अजूनही चुकारे मिळाले नाही, अशी भीषण परिस्थिती आहे. शेतकर्‍यांचे मोर्चे निघत असताना सरकार काय करीत आहे, असा प्रश्‍न चव्हाण यांनी उपस्थित केला. आगामी निवडणुकीसाठी समान विचारधारा असणार्‍या पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहे, अशी कबुली दिली. तर, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी तात्विक मतभेद असल्याने त्यांना सोबत घेण्याची शक्यता खासदार चव्हाण यांनी फेटाळून लावली. शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी ‘पॉलिटीकल व्हिल’ पाहिजे. ती काँग्रेसकडे आहे, असा टोला त्यांनी सत्ताधार्‍यांना लगावला. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुनगेकर, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार हरिभाऊ राठोड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा व सुनील भेले आदी उपस्थित होते.

Web Title: congress focus on unemployment farmers said ashok chavhan