कॉंग्रेसचा गटनेता बदलणार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

नागपूर - शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्याविरोधात पक्षाअंतर्गत विरोधकांनी उघडलेल्या आघाडीला महापालिकेत यश आले आहे. ठाकरे यांना स्वीकृत सदस्य म्हणून महापालिकेत येण्यापासून रोखणे आणि त्यांच्या मर्जीतील गटनेता संजय महाकाळकर यांना बदलणे याकरिता त्यांचे सर्व विरोधक एकत्र आले आहेत. एकूण सोळा नगरसेवकांनी तानाजी वनवे यांना समर्थन जाहीर केले आहे. यामुळे कॉंग्रेसचा गटनेता बदलणार अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.

कॉंग्रेसचे एकूण 29 नगरसेवक आहेत. यापैकी 16 नगरसेवकांनी गटनेता बदलवून तानाजी वनवे यांना गटनेता करण्याची मागणी केली आहे. उद्या आणखी तीन नगरसेवकांचे समर्थन लाभणार असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे वनवे गटांची संख्या 19 होते. महाकाळकर यांच्याकडे 10 नगरसेवक उरतात. बहुमताचा आकडा वनवे यांच्याकडे झुकला आहे. बुधवारी झालेल्या ओळख परडेमध्ये तीन नगरसेवकांनी ठाकरे गटाला जबर धक्का दिला.

आयुक्तांच्या हाती भवितव्य
मंगळवारी कॉंग्रेसतर्फे विभागीय आयुक्तांना पत्र देण्यात आले. त्यांनी तडकाफडकी ओळख परेड घेतली. वनवे समर्थकांचे म्हणणे ऐकून घेतले. गुरुवारी सकाळी 11 ते दुपारी तीन या वेळेत कॉंग्रेसला स्वीकृत सदस्याचे नाव महापालिका आयुक्तांकडे सादर करायचे आहे. मात्र, कॉंग्रेसच्या एका गटाने गटनेता बदलण्याची मागणी केली. बहुमताचा आकडा ग्राह्य धरून गटनेता बदलण्यास मान्यता दिल्यास कॉंग्रेसचा स्वीकृत सदस्य निवडण्याची प्रक्रिया खोळंबू शकते. याचा निर्णय विभागीय आयुक्तांना घ्यायचा आहे.

ओळख परडे कशासाठी
नियमानुसार गटनेता निवडण्याचा अधिकार पक्षाचा असतो. ती पक्षाअंतर्गत बाब असते. याकरिता संबंधित प्रदेशाध्यक्षांचे पत्र आवश्‍यक असते. यापूर्वी प्रफुल्ल गुडधे आणि सुजाता कोंबाडे यांच्या याच कारणावरून भांडण झाले होते. गुडधे न्यायालयात गेले होते. न्यायालयाने महापौरांना गटनेता बदलण्याचा अधिकार नसल्याचे निर्वाळा दिला होता. बहुमताने पक्षाने निर्णय घ्यावा अशीही सूचना केली होती. महापालिकेतील अधिकारी आणि ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या म्हणण्यानुसार गटनेता निवडण्यासाठी पक्षाच्या अध्यक्षाच्या पत्राची गरज आहे. नियम स्पष्ट असताना विभागीय आयुक्तालयातर्फे ओळख परेड कशासाठी घेतल्या जात आहे? असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. काहीतरी शिजत असल्याही शंका व्यक्त केल्या जात आहे.

दावे व दाखले
असा काही नियम नाही. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्याला आपला गटनेता म्हणून निवडण्याचा अधिकार असल्याचा दावा ठाकरे विरोधी गटातर्फे केला जात आहे. याकरिता मुंबई महापालिकेचा दाखला दिला जात आहे. गुरुदास कामत आणि कृपाशंकर सिंग यांच्या गटनेता निवडीवरून वाद झाला होता. त्यावेळी कॉंग्रेसच्या अध्यक्षांनी निवडलेल्या नेत्याला बहुमताच्या आधारे बदलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

ठाकरेंनी ठेका घेतला काय?
विकास ठाकरे महापौर होते. त्यानंतर महापालिकेत विरोधी पक्षनेते होते. दोनदा विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. शहर अध्यक्षसुद्धा तेच आहेत. आता स्वीकृत सदस्यही त्यांना पाहिजे आहे. इतर सर्व बेकार आणि कॉंग्रेसमध्ये तेच एकमेव निष्ठावान आणि कार्यक्षम नेते आहेत काय? असा सवाल ठाकरे यांच्या विरोधकांचा आहे.

सर्व नगरसेवकांनी विभागीय आयुक्तालयात कॉंग्रेसचे नगरसेवक म्हणून नोंदणी केली आहे. शहर कॉंग्रेसचा ठराव नसताना आणि प्रदेशाध्यक्षांचे पत्र नसताना गटनेता बदलण्याचा अधिकार कोणाला नाही. कॉंग्रेसचे काही नेते निव्वळ दिशाभूल करीत आहे. नगरसेवकांमध्ये फूट पाडून पक्षाला बदनाम करीत आहे.
- विकास ठाकरे, शहर अध्यक्ष, कॉंग्रेस

Web Title: congress group leader change