सोनिया, राहुल गांधी जेलमध्ये जातील : डॉ. सुब्रमण्यम स्वामी

dr.-subramanian-swamy
dr.-subramanian-swamy

नागपूर - कश्‍मिरात पीडीपीसोबत संबंध तोडून सुरू केलेल्या कारवाईच्या सरकारच्या निर्णयाबाबत समाधानी आहे. परंतु, कलम ३७० रद्द करण्याची प्रतीक्षा आहे. सरकारला चार वर्षे झाली, आतापर्यंत निर्णय घेतला नाही. कदाचित पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वी निर्णय घेतील, असे नमुद करीत भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारवरही ताशेरे ओढले.

लोकतंत्र सेनानी संघ नागपूरतर्फे शनिवारी सिव्हिल लाइन्स येथील चिटणीस सेंटर येथे आणीबाणी स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर लोकतंत्र सेनानी संघाचे अखिल भारतीय अध्यक्ष कैलाश सोनी, ज्येष्ठ संपादक लक्ष्मणराव जोशी व रवींद्र कासखेडीकर होते. १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळातील स्थिती, अराजकता, स्वातंत्र्यावर गदा आदींवर प्रकाश टाकत डॉ. स्वामी यांनी काँग्रेसवर तोंडसुख घेतले.

आणीबाणीसाठी दोन वर्षांपासून इंदिरा गांधी यांनी पार्श्‍वभूमी तयार केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांनी १९७७ मध्ये निवडणूक घेतली. या निवडणुकीत शहरातील सुशिक्षितांऐवजी ग्रामीण भागातील अशिक्षित व गरिबांनी त्यांना जागा दाखविली. हिंदू धर्म लोकशाही मानणारा धर्म असल्याचे नमूद करीत देशातील नागरिकांचा एकच डीएनए असल्याचे ते म्हणाले. जे मुस्लिम स्वतःला मोहम्मद घोरीचे वंशज मानत असेल, त्यांनी पाकिस्तानात जावे, असेही ते म्हणाले. सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्काराबाबत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सातत्याने डावल्याच्या आरोपासह कश्‍मिरप्रश्‍नही त्यांच्यामुळेच चिघळल्याचे ते म्हणाले.

आणीबाणीची शक्‍यता कमी
डॉ. स्वामी यांनी इंदिरा गांधी यांच्या निवडणुकीतील पराभवानंतर सत्तेत आलेल्या मोरारजी देसाई सरकारने संविधानात आणीबाणीच्या कलमाबाबत सुधारणा केल्याचे सांगितले. केवळ सशस्त्र विद्रोह झाल्यानंतरच आणीबाणी लावता येईल, अशी सुधारणा केल्यामुळे भविष्यात इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीप्रमाणे आणीबाणीची शक्‍यता नाही, असे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.

सारेच काँग्रेस नेते जेलमध्ये जातील
नॅशनल हेरॉल्डप्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी तर एका प्रकरणात पी. चिंदबरम व त्यांचे कुटुंबीय जेलमध्ये जातील, असे भाकीत वर्तवीत त्यांनी काँग्रेस स्वदेशी झाल्यास भवितव्य आहे. विदेशी लोकांच्या काँग्रेसला भवितव्य नसल्याचे नमुद करीत त्यांनी सोनिया गांधी यांनाही टोला लगावला. हिंदू दहशतवादाच्या नावावर काँग्रेसने अनेकांना फसविल्याचा आरोपही त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com