भाजपचे नेते पळपुटे : मुकुल वासनिक

File photo
File photo

यवतमाळ : सत्ताधारी भाजपबद्दल प्रचंड रोष दिसतोय. भाजपने सत्तेत येण्यापूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. विरोधकांनी हिशेब मागितला तर तो दिला जात नाही. राहुल गांधींवर मैदान सोडण्याचा आरोप भाजपचे नेते करतात. मात्र, गांधी नव्हे तर भाजपचे नेतेच पळपुटे असल्याचा आरोप अखिल भारतीय कॉंग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी केला.
ते शुक्रवारी (ता. 11) जिल्ह्यातील कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ यवतमाळात आले होते. स्थानिक जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, खामगावपासून नागपूरपर्यंत जनतेच्या मनात सत्ताधाऱ्यांप्रती संताप बघायला मिळाला. विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांना हिशेब मागितला तर त्यांचे प्रतिनिधी, मंत्री उत्तरे देत नाहीत. आम्ही आमची भूमिका मांडतोय. मात्र, त्यावर सत्ताधारी चकार शब्द काढत नाहीत. शेतकरी संकटात आहेत. बेरोजगारांचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यांना नवीन रोजगार देणे सोडा, जे जुने होते, तेसुद्घा बंद पाडले जात आहेत. त्यामुळे राज्यात सत्ता परिवर्तन अटळ असल्याचा दावा वासनिक यांनी केला.
राहुल गांधी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक प्रचारात उतरणार आहेत. प्रदेश कॉंग्रेसने त्यांचा कार्यक्रमही आखला आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोडतानाच त्यांनी आपण दुपटीने परिश्रम घेऊ, कट्टरतावादी विचारांविरुद्घ लढू, असे जाहीर केले. जिल्ह्यातील दाभडीतच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची "चाय पे चर्चा' झाली होती. देशातील शेतकऱ्यांना त्यांनी दुप्पट शेतमालाला भाव देऊ, असे आश्वस्त केले होते. मात्र, शेतकऱ्यांच्याही तोंडाला पाने पुसल्याचा आरोप वासनिकांनी केला.
यावेळी विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या सव्वालाखे, बाळासाहेब मांगूळकर, आमदार डॉ. वझाहत मिर्झा आदी उपस्थित होते.

370 च्या निर्णयावर प्रहार
राज्याच्या एका भूभागाचे दोन भूभाग करीत स्वतंत्र राज्याचा दर्जा काढून घेत केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याचा आतातायीपणा केंद्राने केला आहे. कुठल्याही माध्यमांच्या प्रतिनिधींना काश्‍मीरमध्ये जाता येत नाही. देशातच ही अघोषित आणीबाणी कशी काय, यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे वासनिक म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com