ठाकरे, राऊत, पांडव, शेळके आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

नागपूर : कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी दिल्लीत घमासान सुरू असून रात्री उशिरा प्राप्त झालेल्या माहितीनुसार पश्‍चिममधून विकास ठाकरे, दक्षिणेतून गिरीश पांडव, मध्य नागपूरमधून बंटी शेळके आणि उत्तरमधून नितीन राऊत यांची नावे जवळपास निश्‍चित झाली असल्याचे समजते. मात्र, यातील काही नावांमध्ये कुठल्याही क्षणी बदल होऊ शकतो अशीही शक्‍यता वर्तविली जात आहे.

नागपूर : कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी दिल्लीत घमासान सुरू असून रात्री उशिरा प्राप्त झालेल्या माहितीनुसार पश्‍चिममधून विकास ठाकरे, दक्षिणेतून गिरीश पांडव, मध्य नागपूरमधून बंटी शेळके आणि उत्तरमधून नितीन राऊत यांची नावे जवळपास निश्‍चित झाली असल्याचे समजते. मात्र, यातील काही नावांमध्ये कुठल्याही क्षणी बदल होऊ शकतो अशीही शक्‍यता वर्तविली जात आहे.
उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी दिल्ली येथे दोन बैठका घेण्यात आल्या. पश्‍चिममधून शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांचेच एकमेव नाव होते. त्यामुळे ठाकरे यांना आधीच निश्‍चित करण्यात आले आहे. दक्षिणेतून गिरीश पांडव यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर आहे. सोबतच प्रमोद मानमोडे यांच्याही नावावर चर्चा झाली असल्याचे समजते. येथून विलास मुत्तेमवार यांचे पुत्र विशाल मुत्तेमवार यांनी दावा केला होता. मात्र, कॉंग्रेसने केलेल्या सर्वेत त्यांचे नाव मागे पडल्याचे सांगण्यात येते. पूर्व नागपूरमधून अभिजित वंजारी यांना तयारी करण्याचे सांगण्यात आले आहे. कॉंग्रेसचे राष्ट्रीय महासचिव तसेच विदर्भाचे निवडणूक प्रमुख मुकुल वासनिक यांनीसुद्धा कॉंग्रेसकडे वंजारी यांच्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे म्हटले आहे. मात्र, या जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने दावा केला असल्याचे समजते.
मध्य नागपूरसाठी सर्वाधिक घमासान सुरू आहे. एक जागा युवक कॉंग्रेसला देण्यात यावी याकरिता युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आग्रही आहेत. त्यांनी बंटी शेळके यांचे नाव रेटले आहे. या नावास मुकुल वासनिक यांनीही पाठिंबा दिला आहे. मात्र, हा मतदारसंघ मुस्लिम आणि हलबाबहुल आहे. याचे दाखले देऊन मुस्लिम समाज या जागेसाठी आग्रही आहे. त्यामुळे जातीय समीकरणाचा फटका शेळके यांना बसू शकतो. उत्तरमधून नितीन राऊत यांनी स्थानिक नगरसेवक व नेत्यांचा विरोध असला तरी पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तसेच अनुसूचित जाती विभागाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. येथून ते तीनवेळा निवडून आले आहेत. माजी मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress leader, vidhansabha election