कॉंग्रेसचे दिग्गज नेते ठरले यंदा कमनशिबी

राजेश चरपे
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

नागपूर : सुमारे दोन दशकांपासून निवडणुकीच्या आखाड्यात हमखास दिसणारे दिग्गज नेते यंदा रिंगणात नसल्याने कार्यकर्त्यांसोबतच मतदारांनाही चुकचकुल्यासारखे होत आहे. याच कारणामुळे समर्थकांमधील खुन्नस नसल्याने निवडणुकीत अद्याप रंगत आल्याचे दिसत नाही. 

नागपूर : सुमारे दोन दशकांपासून निवडणुकीच्या आखाड्यात हमखास दिसणारे दिग्गज नेते यंदा रिंगणात नसल्याने कार्यकर्त्यांसोबतच मतदारांनाही चुकचकुल्यासारखे होत आहे. याच कारणामुळे समर्थकांमधील खुन्नस नसल्याने निवडणुकीत अद्याप रंगत आल्याचे दिसत नाही. 
सुमारे वीस वर्षे सातत्याने पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात सतीश चतुर्वेदी यांचा दबदबा होता. ते मंत्रिमंडाळात होते तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री होते. नागपूरचा कुठलाही निर्णय त्यांच्या उपस्थितीशिवाय होत नव्हता. संपूर्ण कॉंग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या सभोवताल फिरत होते. माजी केंद्रीय मंत्री व खासदार विलास मुत्तेमवार यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळे कॉंग्रेसमध्ये निवडणुकीच्या काळात प्रचंड खुन्नस बघायला मिळत होती. मात्र सलग दोनवेळा झालेल्या पराभवामुळे यंदा सतीश चतुर्वेदी यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. मध्य नागपूरमध्ये यंदा माजी मंत्री अनीस अहमदही दिसणार नाहीत. मध्य नागपूर सोडून पश्‍चिमेत गेल्यानंतर अहमद यांच्या मागे पराभवाचे शुक्‍लकाष्ठच लागले आहे. यंदा त्यांना पक्षाने उमेदवारीसुद्धा दिलेली नाही. 
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खास समजले जाणारे तसेच माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्यावरही नशीब रुसले आहे. उमरेड विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते. मात्र पुनर्रचनेत त्यांचा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. तेव्हापासून त्यांना हक्काचा मतदारसंघच मिळत नाही. 
ते नागपूर जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेवर निवडून आले होते. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळात होते. त्यांनी पश्‍चिम नागपूरमधून उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना शेवटच्याक्षणी कामठीत पाठवण्यात आले होते. येथे पराभव झाल्याने त्यांनी सुरक्षित मतदारसंघ म्हणून रामटेकची निवड केली. तेथे घर घेऊन दोन वर्षांपासून पक्षबांधणी केली. मात्र त्यांना यंदा पक्षाने उमेदवारीच दिली नाही. अभिजित वंजारी राजकारणात कमनशिबी ठरले आहेत. त्यांचे वडील दक्षिण नागपूरमधून निवडून आले होते. मात्र सत्तास्थापनेपूर्वीच हृदयविकाराच्या झटक्‍याने त्यांचे निधन झाले. त्यांनाच कॉंग्रेसची उमेदवारी द्यावी अशी शिफारस तत्कालीन प्रदेशाध्यक्ष प्रभाताई राव यांनी केली होती. त्यांची उमेदवारी निश्‍चित मानल्या जात होती. मात्र स्थानिक नेतृत्वाने विरोध केला. त्यांच्याऐवजी दीनानाथ पडोळे यांना उमेदवारी देण्यात आली. 
वंजारी यांनी बंड पुकारले. मात्र ते यशस्वी होऊ शकले नाही. मागील निवडणुकीत कॉंग्रेसने त्यांना पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात पाठवले. पराभव झाल्यानंतरही त्यांनी पूर्व नागपूरला सोडले नाही. लोकसभेतही सक्रिय होते. पुन्हा निवडणूक लढायचीच असा संकल्प त्यांनी केला होता. मात्र कॉंग्रेसने यंदा त्यांच्या नावाचा विचारच केला नाही. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मागील निवडणुकीत लढण्याची हिंमत दाखवणारे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी यावेळी पक्षाकडे उमेदवारीच मागितली नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress leaders, assembly election