नागपूर जिल्ह्यातील कॉंग्रेस नेत्यांमध्ये धाकधूक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

नागपूर : सावनेरचे आमदार सुनील केदार वगळता जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्यासह कॉंग्रेसच्या यादीत कोणाचेच नाव आले नसल्याने पक्षातील अनेकांची धाकधूक वाढली आहे. सुरेश भोयर, राजू पारवे, संजय मेश्राम, अमोल देशमुख, नाना कंभाले आदी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

नागपूर : सावनेरचे आमदार सुनील केदार वगळता जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्यासह कॉंग्रेसच्या यादीत कोणाचेच नाव आले नसल्याने पक्षातील अनेकांची धाकधूक वाढली आहे. सुरेश भोयर, राजू पारवे, संजय मेश्राम, अमोल देशमुख, नाना कंभाले आदी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सहापैकी चार मतदारसंघ आघाडीत कॉंग्रेसच्या वाट्याला आहेत. काटोल व हिंगणा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असून तेथील उमेदवार जवळपास निश्‍चित आहेत. उमेदवारीसाठी कॉंग्रेसमध्ये खरी स्पर्धा असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. उमरेड मतदारसंघ राखीव असला तरीदेखील कॉंग्रेसमधून संजय मेश्राम व राजू पारवे हे उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. येथून उमेदवारीसाठी सर्वाधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या. तक्षशीला वागदरे यादेखील उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहेत. कामठी मतदारसंघातून कॉंग्रेसकडून सुरेश भोयर यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे. येथून नाना कंभाले, अवंतिका लेकुरवाळे या इच्छूक असल्या तरीदेखील कामठी कॉंग्रेसमध्ये पुन्हा एकदा बाहेरचा उमेदवार लादणार का? अशी भीती आहे. शिवसेनेचे देवेंद्र गोडबोले हेदेखील कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठभ प्रयत्न करीत आहेत.
रामटेकमध्ये भुमिपुत्रांनी स्थानिक उमेदवाराची मागणी करून इच्छुकांना बॅकफुटवर आणले. मात्र, हा स्टंट केवळ निवडणुकीपुरता असल्याचेही मत कॉंग्रेसच्या जाणकारांचे आहे. रामटेकमधून माजी मंत्री तसेच जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक हे उमेदवारीत आघाडीवर आहेत. तर अमोल देशमुख हेदेखील इच्छुक आहेत. तर भुमिपुत्रांपैकी केवळ चंद्रपाल चौकसे हेच प्रभावी उमेदवार ठरू शकतात. युतीमधील बेवनाव कॉंग्रेससाठी रामटेकमध्ये अनुकूल वातावरण तयार करीत असल्याचे मत व्यक्त होत आहे.

यादीतून वर्चस्वाची लढाई
कॉंग्रेसच्या दुसऱ्या यादीत नाव यावे यासाठी इच्छुकांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जाहीर झालेल्या यादीवरूनही जिल्हा कॉंग्रेसमध्ये चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. पहिल्या यादीमुळे जिल्हा कॉंग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर येऊ शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leaders in Nagpur district