कॉंग्रेस नगरसेवक जनतेला घाबरतात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

नागपूर : पहिल्या तीन झोनमधील 12 प्रभागांच्या दौऱ्यानंतर महापौर नंदा जिचकार यांना कॉंग्रेस नगरसेवकांच्या बहिष्काराला सामोरे जावे लागले. महापौर दौऱ्यावरून कॉंग्रेस नगरसेवक व महापौर यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचे चित्र आहे. महापौर नंदा जिचकार यांनी जनतेला घाबरत असल्यानेच कॉंग्रेस नगरसेवकांनी बहिष्कार टाकल्याचा आरोप केला. तर कॉंग्रेस नगरसेवकांनी याबाबत कुठलीही माहिती देण्यात आली नसल्याचे कॉंग्रेस नगरसेवकांनी म्हटले आहे.

नागपूर : पहिल्या तीन झोनमधील 12 प्रभागांच्या दौऱ्यानंतर महापौर नंदा जिचकार यांना कॉंग्रेस नगरसेवकांच्या बहिष्काराला सामोरे जावे लागले. महापौर दौऱ्यावरून कॉंग्रेस नगरसेवक व महापौर यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचे चित्र आहे. महापौर नंदा जिचकार यांनी जनतेला घाबरत असल्यानेच कॉंग्रेस नगरसेवकांनी बहिष्कार टाकल्याचा आरोप केला. तर कॉंग्रेस नगरसेवकांनी याबाबत कुठलीही माहिती देण्यात आली नसल्याचे कॉंग्रेस नगरसेवकांनी म्हटले आहे.
महापौर नंदा जिचकार यांनी "महापौर आपल्या दारी' उपक्रम सुरू केला असून, त्या थेट नागरिकांत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहे. आतापर्यंत त्यांनी मंगळवारी, आशीनगर, लकडगंज झोनचा दौरा केला. आशीनगर झोनमध्ये संपूर्ण दोन कॉंग्रेस नगरसेवक वगळता संपूर्ण बसपाचे सदस्य आहे. त्यांनीही दौऱ्यात उपस्थित राहून महापौरांना जनतेपर्यंत पोहोचविले. परंतु, नुकताच महापौर नंदा जिचकार यांनी सतरंजीपुरा झोनच्या तीन प्रभागांचा केलेल्या दौऱ्यात कॉंग्रेस नगरसेवकांनी बहिष्कार टाकला. महापौर नंदा जिचकार यांनी प्रभाग क्रमांक 5, 20 व 21 मध्ये दौरा केला. प्रभाग पाचमध्ये चारही नगरसेवक भाजपचे आहेत. प्रभाग 20 मध्ये तीन भाजप, एक कॉंग्रेस तर प्रभाग 21 मध्ये दोन भाजप, एक कॉंग्रेस व एक अपक्ष सदस्य आहेत. प्रभाग पाचमध्ये सर्वच नगरसेवक उपस्थित होते. मात्र, प्रभाग 20 मध्ये कॉंग्रेस नगरसेवक रमेश पुणेकर यांनी बहिष्कार टाकला. पुणेकर यांनी दौऱ्याबाबत नगरसेवक म्हणून कुठलीही माहिती देण्यात आली नसल्याचे "सकाळ'सोबत बोलताना सांगितले. प्रभाग 21 मधील कॉंग्रेस नगरसेवक नितीन साठवणे, अपक्ष नगरसेविका आभा पांडे याही या दौऱ्यापासून अलिप्त दिसून आल्या. महापौर जनतेच्या समस्या ऐकायला नव्हे तर सत्कार करून घेण्यासाठी आल्याचा टोलाही एका नगरसेवकाने हाणला. झोनच्या सभापती व सहायक आयुक्तांनी कॉंग्रेस नगरसेवकांपासून दौऱ्याची माहितीच लपवून ठेवल्याचाही आरोप नगरसेवकाने केला. महापौर नंदा जिचकार यांनी अनुपस्थित कॉंग्रेस नगरसेवकांवर विकास कार्यात अडचणी निर्माण करीत असल्याचा आरोप केला.
 
सर्वच नगरसेवकांना सहायक आयुक्तांच्या माध्यमातून पत्र गेले. मात्र उपक्रमांवर बहिष्कार टाकण्याच्या गोष्टी म्हणजे संबंधित नगरसेवक स्वत: नागरिकांना सामोरे जाण्यास घाबरत असल्याचे द्योतक आहे.
- नंदा जिचकार, महापौर.
 
महापौराच्या दौऱ्याबाबत बाबत कुठलीही माहिती सहायक आयुक्तांनी दिली नाही. मी माझ्या प्रभागात दररोज फिरते, नागरिकांच्या समस्याही ऐकते अन्‌ त्या सोडवितेही. उलट जिथे समस्या नाही, अशाच ठिकाणी महापौर दौरा घेत आहेत.
- आभा पांडे, अपक्ष नगरसेविका.

या दौऱ्याबाबत कुठलीही माहिती देण्यात आली नाही. सहायक आयुक्त वराडे व झोन सभापतींनी दौऱ्याची माहिती, स्थळाची माहिती दिली नाही. एकूणच गुप्तपणे हा दौरा करण्यात आला. त्यामुळे उपस्थित राहण्याचा प्रश्‍नच येत नाही.
- नितीन साठवणे, कॉंग्रेस नगरसेवक, प्रभाग 21.

Web Title: congress mayor news