कॉंग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल भाजपमध्ये

कॉंग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल भाजपमध्ये
नागपूर : गोंदियाचे कॉंग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा मडावी यांच्यासह सहा जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्यांसह कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपालदास अग्रवाल गेल्या पाच वर्षांपासून मनाने भाजपमध्येच होते, केवळ शरीराने ते कॉंग्रेसमध्ये होते, असा गौप्यस्फोट केला.
रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये आज भाजपच्या मेगाभरतीचा आणखी एक अंक पार पडला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत गोंदिया जिल्हा भाजप अध्यक्ष हेमंत पटले यांनी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यासह जि. प. अध्यक्ष सीमा मडावी, गोंदिया शहर कॉंग्रेस अध्यक्ष अशोक चौधरी, जि. प. सदस्य, पं. समिती सदस्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. यावेळी ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वन व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, आमदार सुधाकर देशमुख, आमदार सुधाकर कोहळे, आमदार विजय रहांगडाले, भाजप प्रदेश प्रवक्‍त्या अर्चना डेहनकर, महापौर नंदा जिचकार आदी उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी गोपालदास अग्रवाल यांच्या आगमनामुळे आतापर्यंत न जिंकू शकलेली गोंदियाची जागा भाजप जिंकेल, असा विश्‍वास व्यक्त करीत गोंदियातून अप्रत्यक्षपणे त्यांच्या उमेदवारीवरही शिक्‍कामोर्तब केले. गोपालदास अग्रवाल गेली पाच वर्षे केवळ शरीराने कॉंग्रेसमध्ये होते. 2014 मध्ये सरकार स्थापन करताना काही आमदार कमी पडत होते, त्यावेळी सर्वप्रथम गोपालदास आले अन्‌ कॉंग्रेस आमदार म्हणून राजीनामा देऊन पोटनिवडणुकीतून भाजप आमदार म्हणून निवडून येण्याची तयारी दाखविली होती, असा गौप्यस्फोटही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. भाजप हा परिवार असून त्यात आलेल्यांना सांभाळून घेतले जात असल्याचे नमूद करीत मुख्यमंत्र्यांनी जुने व नव्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करावे, असा सल्ला दिला. गेल्या पाच वर्षांत फडणवीस यांनी दिलेला सन्मान व प्रेमामुळे हा परिवर्तनाचा ऐतिहासिक क्षण आल्याचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी नमूद केले. पूर्ण ताकदीनिशी भाजपला विदर्भात मजबूत करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. वयाच्या या टप्प्यावर राजकारणाऐवजी विकासासोबत जाण्याचा निर्णय घेतला. माझी कुठलीही अपेक्षा नसल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com