भाऊ-बाबू यांच्यात दिलजमाई

भाऊ-बाबू यांच्यात दिलजमाई

नागपूर : विधानसभेत जिल्ह्यातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकूण पाच उमेदवार जिंकल्याने दोन्ही पक्षांमध्ये चैतन्य आले असून, दिवाळी मीलनाच्या निमित्ताने एकामेकांचे कट्टर विरोधक असलेले नेते आपसांतील सारे मतभेद विसरून सर्व एकत्र आले. यावेळी सर्वांनी झालेल्या चुका मान्य केल्या. भविष्यात ही एकजूट कायम ठेवू, आगामी सर्व निवडणुकांत साथ अशीच कायम ठेवू, असा आशावाद व्यक्त केला. 
कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, विकास ठाकरे आणि माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार सुनील केदार तसेच कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी मंत्री रमेश बंग, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर आदी उपस्थित होते. अनिल देशमुख यांच्या पुढाकाराने शनिवारी बजाजनगर येथील विष्णूजी की रसोई येथे विधानसभेत निवडून आलेले तसेच दोन्ही कॉंग्रेसच्या सर्व उमेदवारांचा सत्कार आणि दिवाळी मीलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 
मुत्तेमवार आणि चतुर्वेदी गटातील वैर सर्वश्रुतच आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत शहरातून एकही उमेदवार निवडून आला नव्हता. ग्रामीणमधून खुद्द अनिल देशमुख पराभूत झाले होते. सुनील केदार हेच एकमेव त्यास अपवाद ठरले होते. याच कारणांमुळे महापालिकेत कॉंग्रेसला मानहानीजनक पराभव झाला होता. पाच वर्षांतील भाजपच्या कार्यकाळामुळे सारेच नेते अस्वस्थ होते. भाजपच्या दादागिरीला सर्व वैतागले होते. कॉंग्रेसमध्ये कोणी राहिली की नाही, अशी भीती अनेकांना सतावत होती. विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी दोन्ही कॉंग्रेसमध्ये नैराश्‍येचे वातावरण होते. पुन्हा पाणिपत होईल, अशीच शक्‍यता वर्तविली जात होती. भाजपने 220 जागा जिंकण्याचा दावा केला होता. त्यामुळे अनेकजण मनातून आधीच पराभूत झाले होते. काहींनी सुबरीचा निर्णय घेतला. मात्र, शरद पवारांना ईडीचा धाक दाखवताच वातावारण बदलले. उमेदवारांनाही बळ मिळाले. आघाडीने बारापैकी पाच जागा जिंकल्या. यानिमित्ताने दोन्ही कॉंग्रेस आता एकजूट झाली आहे. 
सारे श्रेय पवार यांना 
विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी, अनिल देशमुख सर्वच प्रमुख नेत्यांनी विजयाचे सारे श्रेय शरद पवार यांना दिले. पावसातील सभा आणि ईडीच्या धमक्‍यांना न घाबरता पवारांनी सर्वांना हिम्मत दिली. त्यामुळेच आत्मविश्‍वास मिळाला आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी जिवंत झाल्याने सर्वांनी आपल्या भाषणातून मान्य केले. 
सर्व उमेदवारांचा सत्कार 
कार्यक्रमात विकास ठाकरे, नितीन राऊत, गिरीश पांडव, पुरुषोत्तम हजारे, बंटी शेळके, अनिल देशमुख, सुनील केदार, राजू पारवे, सुरेश भोयर, विजय घोडमारे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. दोन उमेदवार वैयक्तिक कारणामुळे उपस्थित नव्हते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com