कॉंग्रेस, राष्ट्रवादी धास्तावली महापालिका, झेडपी कशी लढायची?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

नागपूर - मोदी लाट ओसरली आणि नोटाबंदीने सर्वसामान्यांना सर्वाधिक फटका बसला असे तर्क व्यक्त केले जात असताना नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या विजयाची पताका दिवसेंदिवस उंचावत चालली असल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत शिवसेनासुद्धा धास्तावली आहे.

नागपूर - मोदी लाट ओसरली आणि नोटाबंदीने सर्वसामान्यांना सर्वाधिक फटका बसला असे तर्क व्यक्त केले जात असताना नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या विजयाची पताका दिवसेंदिवस उंचावत चालली असल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत शिवसेनासुद्धा धास्तावली आहे.

नगरपालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे निकाल जाहीर झाले आहेत. यात भाजपचे उमेदवार मोठ्या प्रमाणात विजयी झाले आहेत. नगराध्यक्षाची थेट निवड हेसुद्धा भाजपच्या पथ्यावर पडले आहे. विशेषतः विदर्भात भाजपने चांगलीच मुसंडी मारली आहे. दोन महिन्यांनंतर नागपूर महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. हीच लाट कायम राहिल्यास काही खरे नाही, असे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राज्यात आणि केंद्रात सत्ता नसताना भाजपने नागपूर महापालिका भाजपने सलग दोनदा काबीज केली. मात्र, दोन्ही वेळेस भाजपला सत्तेसाठी अपक्षांचा टेकू घ्यावा लागला. आता दोन्हीकडे भाजपची सत्ता आहे. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कामाचा झपाटा लावला आहे. शंभर नगरसेवक निवडून आणण्याचे टार्गेट ठेवले आहे. कोट्यवधींचे प्रकल्प नागपुरात येऊ घातले आहेत. नागपूरमध्ये कुठल्याही वस्तीत गेल्यास कॉंक्रिटच्या रस्त्याचे काम सुरू असल्याचे दिसते. पिण्याच्या पाण्याचीही समस्या जवळपास दूर झाली आहे. आता पाण्यासाठी नव्हे तर बिलासाठी मोर्चे निघत आहेत. अनधिकृत ले-आउट, पट्टेवाटप, अतिक्रमण यासारखे नागरिकांच्या जिव्हाळ्याचे तसेच मागील अनेक वर्षांपासून सरकार दरबारी प्रलंबित पडलेले अनेक प्रश्‍न मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारात मार्गी लावले आहेत. सुधार प्रन्यासच्या विरोधात सर्वाधिक रोष शहरात होता. त्याचेही पंख छाटण्यात आले आहेत. या सर्व जमेच्या बाबी निवडणुकीत भाजपला फायद्याच्या ठरणार आहेत. जिल्ह्यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामाचा झंझावात सुरू आहे.

शहर कॉंग्रेसमध्ये फूट
दुसरीकडे नोटाबंदी तसेच भाजपच्या कारभाराने असंतोष खदखदत असला तरी कॉंग्रेसला अंतर्गत गटबाजीने तो कॅश करणे अवघड जात आहे. शहरात कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. कोणीच कोणाचे ऐकण्यास तयार नाही. दोन्ही गटांचे समांतर कार्यक्रम सुरू आहेत.

उमेदवार धास्तावले
कॉंग्रेसच्या दोन्ही गटांत आपसांत समेट घडेल असे कुठलेच चिन्ह दिसत नाही. प्रदेशाध्यक्ष व राज्यातील बड्या नेत्यांनी हाताची घडी घातली आहे. यात कार्यकर्ते भरडले जात आहे. कोण उमेदवारी देईल आणि कोण केव्हा कापेल याचा नेम नसल्याने उमेदवार धास्तावले आहेत.

Web Title: Congress, NCP municipal amenities