कॉंग्रेसचे 10 हजार कार्यकर्ते सेवाग्रामला जाणार

File photo
File photo

नागपूर : वर्ध्यातील सेवाग्राम कॉंग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक त्यानंतर भाजपच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या रॅलीत नागपूर जिल्ह्यातून 10 हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रीय महासचिव तसेच प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे रविवारपासूनच (ता. 30) नागपुरात तळ ठोकणार आहेत.
बैठकीला राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह सर्वच राष्ट्रीय नेते सहभागी होणार आहेत. बैठकीनंतर काढण्यात येणाऱ्या रॅलीच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल फुंकला जाणार आहे. यामुळे ही रॅली कॉंग्रेसने चांगलीच गंभीरपणे घेतली आहे. आज शहराध्यक्ष विकास ठाकरे तसेच माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार यांच्या प्रमुख उपस्थितीत देवडिया भवन येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. मुत्तेवार यांनी सेवाग्राम येथील संपूर्ण कार्यक्रमाची माहिती उपस्थितांना दिली. विकास ठाकरे यांनी शहरातील 18 ब्लॉकमधून प्रत्येकी 300 अशा पद्धतीने जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातून तब्बल 10 हजार कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे सांगितले. रॅलीत सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांचा आकडा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना द्यायचा असल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीला ऍड. अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, दिनेश बानाबाकोडे, प्रज्ञा बडवाईक, बंडोपंत टेंभूर्णे आदी उपस्थित होते.
सोनिया, राहुल, मनमोहनसिंग एकाच विमानात
सेवाग्रामसाठी दोन ऑक्‍टोबरला राहुल गांधी, सोनिया गांधी तसेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग एकाच विमानाने दिल्लीवरून नागपूरला येणार आहेत. ते साडेअकरा वाजता नागपूर विमानतळावर दाखल होतील. येथून हेलिकॉप्टरने सेवाग्रामला जातील.

76 वर्षांनंतर विदर्भात बैठक
कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक तब्बल 76 वर्षांनंतर विदर्भात होत आहे. 1942 ला कार्यकारिणीची बैठक नागपूरमध्ये धंतोलीच्या शेजारी असलेल्या परिसरात झाली होती. त्यानंतर या परिसराचे कॉंग्रेसनगर असे नामकरण झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com